पुणे – गणेशोत्सव अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असून, नुकतीच शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस आयुक्तालयात बैठक पार पडली. करोनाच्या संसर्गाचे यंदाच्या उत्सवावर सावट असून शासनाने केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार मंडळांसाठी नियमावली करण्यात येणार आहे.
उत्सव साधेपणाने कसा साजरा करता येईल, याबाबतची चर्चा बैठकीत करण्यात आली. पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्यासह शहरातील प्रमुख मानाच्या मंडळांचे पदाधिकारी या बैठकीस उपस्थित होते. सहपोलीस आयुक्त डॉ. शिसवे म्हणाले, “शासनाने मंडळांसाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या आहेत. या सूचनांचे पालन काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. प्रतिष्ठापना आणि विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसणार आहे. घरगुती गणेशोत्सवाबाबत काळजी घेणे गरजेचे आहे. घरगुती गणेशोत्सव साजरा करणाऱ्यांनी घरीच श्रीं’च्या मूर्तीचे विसर्जन करावे.’
शहरातील गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचे मत जाणून घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. उत्सव साधेपणाने कसा साजरा करता येईल, याबाबत पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेण्यात आली. मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
– डॉ. के. वेंकटेशम, पोलीस आयुक्त