राजस्थानचा पंजाबला हादरा

आबूधाबी – बेन स्टोक्‍सचे वादळी अर्धशतक आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ, संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा आणि जोस बटलर यांच्या फलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा सात गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे पंजाबच्या प्ले ऑफ गटात स्थान मिळविण्याच्या स्वप्नांना धक्‍का लागला. विजयासाठी आवश्‍यक धावांचा पाठलाग करताना राजस्थानच्या बेन स्टोक्‍स आणि रॉबिन उथप्पाने आक्रमक सलामी दिली. उथप्पा बाद झाल्यानंतर स्टोक्‍सने वादळी फलंदाजी केली. स्टोक्‍स बाद झाल्यानंतर सॅमसन, कर्णधार स्मिथ व बटलर यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

तत्पूर्वी, सलामीवीर मनदीप सिंग पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर कर्णधार लोकेश राहुल व ख्रिस गेल यांच्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर किंग्ज इलेव्हन पंजाबने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात 20 षटकांत 4 गडी गमावून 185 धावा केल्या. वादळी खेळी करणाऱ्या गेलचे शतक मात्र केवळ एका धावेने हुकले.

हा सामना जिंकत प्ले-ऑफमधील स्थान निश्‍चित करण्यासाठी पंजाबला विजयाची आवश्‍यकता होती. त्यामुळे नाणेफेक कोणता संघ जिंकतो ते महत्त्वाचे होते. राजस्थानचा कर्णधार स्टिव्ह स्मिथने नाणेफेक जिंकत पंजाबला प्रथम फलंदाजी दिली व स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतली. डावातील पहिल्याच षटकातील पहिल्याच चेंडूवर जरी जोफ्रा आर्चरने मनदीपला बाद करत चांगली सुरुवात केली तरीही त्यानंतर मात्र, त्यांच्या गोलंदाजीचा गेल व राहुलने पालापाचोळा केला. त्याने थाटात अर्धशतक पूर्ण केले. कर्णधार राहुलही भरात होता. स्पर्धेतील सहाशे धावांचा पल्लाही त्याने या सामन्यात पार केला.

मात्र, त्याचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही. बदली गोलंदाज बेन स्टोक्‍सने त्याला 46 धावांवर बाद केले. त्याने आपल्या खेळीत 41 चेंडूंचा सामना करताना 3 चौकार व 2 षटकार अशी फटकेबाजी केली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 120 धावांची बहुमोल भागीदारी केली. राहुल बाद झाल्यावर भरात असलेला निकोलस पूरन खेळपट्टीवर आला व त्याने गेलला साथ देत संघाच्या धावा वेगाने वाढवल्या. पण 10 चेंडूत 3 षटकारांची फटकेबाजी करत तो 22 धावांवर बाद झाला. त्यावेळी या जोडीने संघाचे दीडशतक फलकावर लावले. त्यानंतर आलेल्या ग्लेन मॅक्‍सवेलने पुन्हा एकदा निराशा केली.

शतकाकडे वाटचाल करणारा गेल ते पूर्ण करण्यात मात्र अपयशी ठरला. त्याचा 99 धावांवर आर्चरने त्रिफळा उडवला. गेलने आपल्या खेळीत 63 चेंडूंचा सामना करताना 6 चौकार व तब्बल 8 षटकारांची आतषबाजी केली. शतक हुकल्याने निराश झालेल्या गेलने बॅटवर आपला राग काढला.

गेलचे हजार षटकार
टी-20 क्रिकेटच्या इतिहासात 1 हजार षटकार पूर्ण करणारा ख्रिस गेल पहिलाच फलंदाज ठरला. गेलने आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातही 341 षटकारांची नोंद केली. गेलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 130 सामने खेळताना ही कामगिरी केली.

किंग्ज इलेव्हन पंजाब – 20 षटकांत 4 बाद 185 धावा. (लोकेश राहुल 46, निकोलस पूरन 22, ख्रिस गेल 99, ग्लेन मॅक्‍सवेल नाबाद 6, दीपक हुडा नाबाद 1, जोफ्रा आर्चर 2-26, बेन स्टोक्‍स 2-32).
राजस्थान रॉयल्स – 17.3 षटकांत 3 बाद 186 धावा. (बेन स्टोक्‍स 50, संजू सॅमसन 48, रॉबिन उथप्पा 30, स्टिव्ह स्मिथ नाबाद 31, जोस बटलर नाबाद 22, मुरुगन अश्‍विन 1-43, ख्रिस जॉर्डन 1-44)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.