Rajasthan Election – राजस्थानमध्ये जवळपास दीड महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीची (Rajasthan Election) सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी गुरुवारी थंडावली आहे. सत्ताधारी कॉंग्रेसला सत्तेतून खेचण्यासाठी भाजप, तर सत्ता कायम ठेवण्यासाठी कॉंग्रेस प्रयत्नशील आहे.
आता राजस्थानमध्ये उद्या (25 नोव्हेंबर) 200 जागांपैकी 199 जागांवर मतदान होणार आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी प्रवीण गुप्ता यांनी दिली. तसेच 3 डिसेंबरला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
श्रीगंगानगरच्या करणपूर मतदारसंघातील विद्यमान आमदार आणि कॉंग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंग कुनार यांच्या निधनामुळे या मतदारसंघातील निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे.
या निवडणुकीत एकूण 1862 उमेदवार रिंगणात असून मतदारांची संख्या 5,25,38,105 इतकी आहे. यामध्ये 18-30 वयोगटातील 1,70,99,334 मतदारांचा समावेश आहे. त्यापैकी 22,61,008 नवीन मतदार 18-19 वयोगटातील आहेत.
कधीच कोणत्याही पक्षाला दुसऱ्यांदा सरकार स्थापन करण्याची संधी न देणे ही राजस्थानची परंपरा आहे. पण यंदाच्या निवडणुकीत राजस्थानमधील ही परंपरा लोक मोडीत काढणार की कायम ठेवणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागेल आहे.
कॉंग्रेस सरकारच्या काळात कल्याणकारी योजना, भाजप सत्तेत आल्यापासून देशात महागाई वाढली, पुन्हा सत्तेत आल्यास राज्यात जातनिहाय जनगणना करणार, असे आश्वासन कॉंग्रेसकडून देण्यात आले.
तर भाजपने कॉंग्रेसच्या कल्याणकारी योजना केवळ कागदोपत्री, लाल डायरी हे कॉंग्रेसच्या भ्रष्टाचाराचे प्रतीक आणि कॉंग्रेसमध्ये घराणेशाही या मुद्द्यावर आरोप करण्यात आले. तर भाजपची सत्ता राजस्थानमध्ये आल्यानंतर भ्रष्टाचाराची चौकशी करणार असल्याचे आश्वासन दिले.