महाराष्ट्रात चौथी भाषा आली तर मनसेचा बांबू बसेल

राज ठाकरेंचा इशारा

मुंबई : मनसेच्या दणक्‍यामुळे मोबाईलवर हिंदी आणि इंग्रजीत येणाऱ्या सूचना मराठीत येऊ लागल्या. त्रिभाषा सूत्र ठीक आहे. पण, चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न कराल तर बांबू बसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शुक्रवारी दिला. नोटाबंदीनंतर उद्योगधंदे बंद पडले, लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या. पण कोणी सरकारला प्रश्नच विचारत नाही. हाच लोकांच्या मनात असणारा राग, मनातील आग व्यक्त करायला मनसेला विधानसभेत प्रबळ विरोधी पक्ष बनायचे आहे. मला या सरकारवर अंकुश ठेवायचाय. त्यासाठी मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे यांची भांडूप येथे प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला. महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांत 14 हजार शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. भाजपाध्यक्ष अमित शहा महाराष्ट्रात प्रचारसभा घेउन काश्‍मिरातील 370 कलम रद्द केल्याची भाषणे करत आहेत. पण शेतकरी आत्महत्याबाबत त्यांनी चकार शब्दही काढलेला नाही. त्यांची सभा सुरू असतानाच त्याच्या बाजूच्या गावातच शेतकछयाने आत्महत्या केल्याचे राज ठाकरे म्हणाले. भाजपा असेल, शिवसेना असेल निवडणुका आल्या की फक्त जाहीरनामे काढायचे, लोकांच्या तोंडावर फेकायचे. सत्ता मिळाली की पाच वर्षे पुन्हा ते सर्व विसरून जायचे असे सांगताना भाजपा-शिवसेनेने पाच वर्षांपुर्वी जाहीरनाम्यात काय वचने दिली होती त्याची यादीच राज ठाकरे यांनी वाचून दाखविली.

मुंबईत एलफिस्टनचा पूल पडला,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बाहेरचा पूल पडला. निरपराध माणसे त्यात मेली.डोंबिवली,ठाणे इत्यादी ठिकाणी रस्त्यांवर मोठाले खडडे आहेत. खडडयांमुळे वाहनांचे अपघात होउन माणसे त्यात मरत आहेत. पण सत्ताधा-यांना त्याचा काही फरक पडत नाही. जनता खडडयांत आणि हे टक्क्‌यांत मस्त आहेत.याचा जनतेला राग कसा येत नाही असा सवाल राज ठाकरे यांनी केला.

एकेकाळी महाराष्ट्राने अटकेपार झेंडा लावला होता.संपूर्ण देशावर मराठयांनी एकेकाळी राज्य केले होते.हाच महाराष्ट्र आज थंड पडलाय.महाराष्ट्र इतका गलितगात्र कधी झाल्याचे पाहिले नाही असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.