औरंगाबाद – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदानावर 1 मे रोजी सभा घेण्याची घोषणा केली होती. मनसेकडून या सभेची जय्यत तयारी सुरु करण्यात आली असून, मनसेचे काही पदाधिकारी देखील काल औरंगाबाद मध्ये दाखल झाले आहेत.
दरम्यान, सभेपूर्वी औरंगाबाद पोलिसांनी मोठा निर्णय घेतला असून, औरंगाबाद शहरात 9 मे पर्यंत जमावबंदीचे आदेश पोलिसांकडून जारी करण्यात आले आहे.
त्यामुळे निदर्शने, धरणे मोर्चा, मिरवणूक काढण्यास मनाई आदेश लागू झाले आहेत. औरंगाबात पोलिसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळणार की नाही? हे आता पहावे लागणार.
मात्र, आता औरंगाबादमध्ये होणाऱ्या जाहीर सभेला परवानगी देण्याबाबत पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या असून, आज ( गुरुवारी ) दुपारी बारा वाजेपर्यंत राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळण्याची शक्यता असल्याचं समोर आले आहे.
तसेच परवानगी देताना काही अटी आणि शर्ती सुद्धा घालून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे बहुचर्चित औरंगाबादच्या राज ठाकरेंच्या सभेला आता परवानगी मिळणार असल्याचे आता जवळपास स्पष्ट झाले आहेत.