मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या निवासस्थानी म्हणजेच सागर बंगल्यावर भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे ही भेट राजकीय दृष्टीकोनातून महत्वाची असल्याचे म्हटले जात आहे. या भेटीदरम्यान काय चर्चा झाली? याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.
एका वृत्त वाहिनीनुसार, राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. ही भेट अत्यंत गुप्त ठेवण्यात आली होती. त्यामुळे या भेटीमागे नेमकं काहीतरी मोठं आणु महत्वाचं कारण असू शकतं अशी चर्चा आहे.
यापूर्वी देखील या दोघांमध्ये भेट झाली होती, मात्र त्या भेटीआधी माहिती देण्यात आली होती. मात्र या भेटी संदर्भात दोघांकडून कोणत्याही प्रकारे अधिकृत माहिती देण्यात आली नाही. राज ठाकरे यांची शस्त्रक्रिया झाल्यापासून गेल्या दोन महिन्यांपासून कोणाच्याही भेटी-गाठी करत नव्हते, मात्र त्यानंतर आता पुन्हा एकदा राज ठाकरे एक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. त्यांनी स्वत: सभा घेतली. तसेच त्यांच्या दौऱ्याबाबत माहितीही दिली होती.