मुंबई – वाशीतील एका नाट्यगृहात २६ जानेवारी २०१४ ला राज ठाकरे यांची सभा झाली होती. या सभेमध्ये त्यांनी राज्यभरातील टोल वसुलीबाबत संताप व्यक्त केला होता. या वेळी टोलविरोधात त्यांनी भडकावू भाषण केल्यानंतर सभा संपताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी वाशी टोलनाक्यावर तोडफोड केली होती. या प्रकरणी मनसे शहर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून अटक झाली होती. तर भडकावू भाषण केल्याप्रकरणी राज ठाकरे यांच्यावरदेखील वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी आज राज ठाकरे जामीन घेण्यासाठी शनिवारी वाशी न्यायालयात हजर राहणार आहेत. त्यानुसार शनिवारी राज ठाकरे वाशी न्यायालयात हजर राहून जामीन घेणार आहेत. वाशी न्यायालयात ठाकरे यांना जामीन मिळवून देण्यासाठी वकील अक्षय काशीद, किशोर शिंदे यांची फळी प्रक्रिया हाताळणार आहे. मनसेच्या कायदेतज्ज्ञांची ही फळी सदर खटल्यात न्यायालयात ठाकरे यांची बाजू सांभाळत आहे.