टोरांटो – भारतीय वंशाचे राज चौहान हे कॅनडातील ब्रिटीश कोलंबिया प्रांताच्या विधानसभेचे सभापती म्हणून निवडले गेले आहेत. या पदावर निवड होणारे ते पहिलेच भारतीय वंशाचे लोकप्रतिनिधी ठरले आहेत. चौहान हे ब्रिटीश कोलंबिया विधानसभेमध्ये बर्नाबे-एडमोंडस मतदारसंघातून पाचवेळेस निवडून जात आहेत.
त्यांनी यापूर्वीच्या सरकारमध्ये उपसभापती म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सभापती डॅरेला प्लाकास निवृत्त झाल्यावर ते सभापती पदाची सूत्रे स्वीकारतील. कॅनडातील सरकारी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.
पंजाबमध्ये जन्मलेल्या चौहान यांनी 1973 मध्ये कॅनडाला स्थलांतर केले आणि शेतावर काम करण्यास सुरवात केली. शेतांवर काम करणाऱ्या विस्थापित शेतमजूरांच्या समस्यांवर त्यांनी अधिक लक्ष दिले आहे. सभापती म्हणून जबाबदारी सोपवताना सदस्यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांने समाधान व्यक्त केले आणि पुढील काळातही ही सेवा सुरू ठेवण्याची ग्वाही दिली.
ऑक्टोबरमध्ये ब्रिटीश कोलंबियात झालेल्या निवडणूकीनंतर सत्तेवर आलेल्या न्यू डेमोक्रॅटिक पार्टीच्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनासाठी चौहान यांची सभापती म्हणून निवड करण्यात आली आहे.