सातारा (प्रतिनिधी) – केंद्राच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला सातारा जिल्ह्यात विविध शेतकरी, कामगार संघटना व राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला आहे. शेतकरी आंदोलकांनी दिलेल्या “भारत बंद’च्या हाकेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी मंगळवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. जिल्ह्यातील बाजार समित्यांसह अन्य सर्व व्यवहार बंद राहिले; परंतु दळणवळण व अत्यावश्यक सेवा सुरू राहिल्याने जनजीवन विस्कळीत झाले नाही. हा बंद शांततेत झाला. आंदोलनाला पाठिंबा देताना राजकीय पक्षांनी रॅली काढल्या. शेतकरी व कामगार संघटनांच्यावतीने जिल्हा प्रशासनाला निवेदने देण्यात आली. धरणे आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या कृषी धोरणाचा निषेध करण्यात आला. स्वाभिमानी शेतकरी संघटना, शरद जोशीप्रणित शेतकरी संघटना, शरद जोशी विचारमंच, किसान बहुजन क्रांती मोर्चा, किसान आंदोलन समर्थन मंच, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना, आप या पक्षांच्यावतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना निवेदने देण्यात आली. महाराष्ट्र स्टेट बॅंक एम्प्लॉइज फेडरेशनने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला असला तरी सर्व बॅंकांमधील व्यवहार सुरळीत होते. बॅंक कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. रिक्षा व एसटी बसेस सुरू असल्या तरी पुणे, मुंबई, सोलापूर, कोल्हापूर व अन्य ठिकाणच्या लांब पल्ल्यांच्या एसटी बसेसवर बंदचा परिणाम जाणवला. सातारा-बोरिवली या एकूण 19 फेऱ्यांपैकी नऊ, सातारा-पुणे विनाथांबाच्या केवळ दहा फेऱ्या झाल्याची माहिती आगारातून देण्यात आली. सातारच्या मध्यवर्ती बसस्थानकात तुरळक प्रवासी होते. जिल्ह्यांतर्गत बससेवा पुरेशा क्षमतेने सुरू नव्हती. ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट कॉंग्रेसच्या प्रकाश गवळी यांनी “चक्का जाम’चा इशारा दिला होता. या संघटनेने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याने रस्त्यांवर तुरळक वाहतूक होती, तर पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरही शुकशुकाट होता. औषध दुकाने, पेट्रोल पंप, दूध या अत्यावश्यक सेवा नेहमीप्रमाणे सुरू होत्या. व्यापारी पेठा पूर्णपणे बंद असल्या तरी सर्वसामान्यांना फारसा त्रास होऊ नये, याची काळजी आंदोलकांनी घेतली होती. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले नाही. राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी सातारा शहरात बाइक रॅली काढली. राजवाडा येथून निघालेली रॅली पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अलीकडे अडविली. शिंदे यांच्यासह काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. काही वेळाने त्यांची सुटका करण्यात आली. सातारा, कराड, वाई, फलटण, लोणंद, महाबळेश्वर, खंडाळा, पाटण, वडूज, दहिवडी, लोणंद, खंडाळा, शिरवळ आदी ठिकाणी बंद शांततेत झाला. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्ह्यात कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.