ग्रामपंचायतींकडून निधी; शंभर टक्के रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी झेडपीचा पुढाकार
सातारा – यावर्षी जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने दुष्काळाचे सावट असून जमिनीखाली देखील पाण्याचे स्त्रोतही कमी झाले आहेत. या परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढील वर्षी पावसाळ्यापर्यंत जिल्ह्यातील शंभर टक्के ग्रामपंचायतींमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग (जलपुनर्भरण) बसविण्यासाठी सातारा जिल्हा परिषदेने पुढाकार घेतला आहे.
सध्यस्थितीत जिल्ह्यातील एक हजार 190 गावांमध्ये ग्रामपंचायतींच्या निधीतून शाळा व ग्रामपंचायतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंग बसवण्यात आले आहेत. हा उपक्रम राबविणारी सातारा जिल्हा परिषद राज्यात एकमेव असून यावर्षात आणखी उठावदार काम करण्यासाठी झेडपीने पुढाकार घेतला आहे.
जमिनीखालील पाणी संपूर्णपणे नष्ट झाल्यास पाण्याची पातळी पूर्ववत करण्याकरिता पावसाचे पाणी जमिनीमध्ये किमान दहा वर्ष जिरविणे गरजेचे असते.
बेसुमार वाढत चाललेले नवनवीन इमारती, मोठमोठ्या कारखान्यांमध्ये पाण्याचा होणारा अपव्यय, वृक्षतोड, बेकायदेशीररित्या खणलेल्या बोअरवेल्स यासारख्या विविध कारणांमुळे जमिनीखालील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. या विपरीत परिस्थितीला बदलण्यासाठी रेन वॉटर हार्व्हेस्टिंगचा पर्याय चांगला आहे. यासाठी जिल्हा परिषदेने एक पाऊल पुढे टाकून गावां-गावांमध्ये पाण्याच्या अपव्यय टाळण्यासाठी जनजागृती केली. त्यातून रेनवॉटर हार्वेस्टिंगचा चांगला पर्याय समोर येऊन त्याची युनिट गावांमधील शासकीय इमारतीवर बसविण्यासाठी प्रोत्साहन दिले.
जिल्ह्यातील 80 टक्के गावांमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंगचे युनिट बसविण्यात आली आहेत. त्यासाठी ग्रामपंचायतींनी 15 वा वित्त आयोग, ग्रामनिधी किंवा रोजगार हमीचेही सहकार्य घेतले आहे. या उपक्रमामुळे पाण्याची बचत होणार असून शंभर टक्के गावांमध्ये उपक्रम राबविला जाणार आहे. एक हजार 190 गावांमध्ये योजना कार्यान्वित झाली असून त्यासाठी 15 व्या वित्त आयोगातून निधी देण्यात आला आहे.
जिल्ह्यात एक हजार 492 ग्रामपंचायती असून एक हजार 170 गावांमधील शासकीय इमारतींवर रेनवॉटर हार्वेस्टिंग बसविण्यात आली आहे. फलटण तालुक्यातील 131 गावांपैकी 130 गावांमध्ये रेनवॉटरचे युनिट बसविले आहेत. हा उपक्रम 100 टक्के राबविणारा फलटण एकमेव तालुका आहे. पाण्याचा अपव्यय टाळून पाणी संकलन करणे काळाची गरज आहे. त्यामुळे पाण्याची बचत करण्यासाठी रेन वॉटर हार्वेस्टिंगचे युनिट ग्रामपंचायत निधीतून गावातील शासकीय इमारतीवर बसविण्यात येत आहे.
-अर्चना वाघमळे
(उपमुख्य कार्यकारी अधिकारी)
जिल्हा परिषद राज्यात अग्रेसर
सातारा जिल्हा परिषदेने नेहमीच विविध उपक्रम, योजना राबवून राज्यात आदर्शवत असे काम केले आहे. सध्या दुष्काळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहित धरुन सातारा जिल्हा परिषदेने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा उपक्रम हाती घेतला आहे. सातारा तालुक्यात 180, कोरेगाव 127, खटाव 102, माण 51, फलटण 130, खंडाळा 60, वाई 99, जावळी 103, महाबळेश्वर 21, कराड 133,पाटण तालुक्यात 184 ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला आहे. हा उपक्रम प्रभावीपणे राबवणारी सातारा जिल्हा परिषद एकमेव ठरली आहे.