पाटण – कोयना पाणलोट क्षेत्रातील कोयना नवजा व महाबळेश्वर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढला असून धरणात येणाऱ्या पाण्याची आवक ही त्यामुळे वाढली आहे. कोयना धरणात सध्या प्रति सेकंद 48 हजार 427 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणाचा पाणीसाठा 44.71 टीएमसी झाला आहे. धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोणा नदीपत्रात करण्यात येत आहे.
कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. सायंकाळी पाच नंतर पावसाचे प्रमाण वाढत असून 100 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस कोयना धरणातील पाणलोट क्षेत्रात पडत आहे. गेल्या बारा तासात धरणाची पाणी पातळी सहा फुटाणे वाढली असून धरणाचा पाणीसाठा तब्बल 4.8 टीएमसी ने वाढला आहे. परिणामी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने बुधवारी पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.
मात्र गुरुवारी सायंकाळी पायथागृहातील दोन्ही विद्युत जनित्रे सुरू करून त्याद्वारे 2100 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात करण्यात येत आहे. कोयना नदी पत्रात पाण्याची पातळी वाढत असल्याने मुळगाव पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मणदुरे, जळव मार्गावर डोंगर घासरण्याच्या घटना घडल्या आहेत त्या बाजूला सारून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला आहे तर तालुक्यातील मुरुड या ठिकाणी गोरेवाडी (मुरुड) येथील तानाजी गुजाबा घाडगे यांची घराची भिंत पडली आहे. मात्र या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. गेल्या बारा तासात कोयना 145, नवजा 139 तर महाबळेश्वर मध्ये विक्रमी 335 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आतापर्यंत पडलेल्या पावसाच्या तुलनेत महाबळेश्वर मध्ये 2239 मिलिमीटर एवढा एकूण पाऊस पडला आहे.
प्रशासन अलर्ट
पाटण तालुक्यात होत असलेली पर्जन्यवृष्टी व कोयना धरणातून होत असलेला पाण्याचा विसर्ग यामुळे कोयना नदीपत्रात पाण्याची पातळी वाढत आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना धोक्याचा इशारा देण्यात आला आहे. तर सततच्या पावसामुळे दरड कोसळणे, जमीन खचणे यामुळे दळणवळण ठप्प होणे अशा घटना घडू लागल्याने पाटणचे प्रशासन अलर्ट झाले आहे. प्रांताधिकारी सुनील गाढे हे स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देत आहेत तर तहसीलदार रमेश पाटील हे ही आपत्ती निवारणाबाबत कार्यवाही करत आहेत.