फलटण (प्रतिनिधी) – फलटण शहर आणि परिसराला रविवारी रात्री विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. काही ठिकाणी गारा पडल्या. या अवकाळी पावसामुळे मोठी वित्तहानी झाल्याची भीती व्यक्त होत आहे.
फलटण शहर आणि परिसरात गेल्या चार दिवसांपासून प्रचंड उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यांना या पावसाने दिलासा दिला. शहर परिसरात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या धुवॉंधार पावसाने झोडपून काढले. या पावसामुळे हवेतील उष्णता कमी होण्यास मदत झाली. आज सकाळपासून ऊन व ढगाळ वातावरण यामुळे फलटण शहर आणि परिसरात कमालीचा उकाडा होता. या पावसाने हवेत गारवा पसरला.
गेल्या आठ दिवसांत दोन वेळा पावसाने हुलकावणी दिली होती. आज सायंकाळी सहानंतर आकाश काळ्याकुट्ट मेघांनी भरून आले होते. त्यावेळी सुटलेल्या वादळी वाऱ्यामुळे आजही पाऊस फलटणकरांना पुन्हा हुलकावणी देणार, असे वाटत होते. मात्र, वरुणराजाने दिलासा दिला. फलटणसह आदर्की, साखरवाडी, बरड, गिरवी, तरडगाव व अन्य भागात ही पावसाने हजेरी लावली. काही ठिकाणी गारा पडल्याने शेतकरी वर्गासह सर्वसामान्यांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणचा वीजपुरवठा बंद पडला होता. बहुतांश भागात रात्री उशिरापर्यंत मेघगर्जनेसह पाऊस सुरू होता.