कराड (प्रतिनिधी) –हवेलीवाडी-सवादे (ता. कराड) येथे शेतातील हत्ती गवतातून ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरून दोन गटात कुऱ्हाडीने तुंबळ मारामारी झाली. ही घटना शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. यात गावच्या पोलीस पाटलासह दोन्ही गटातील एकूण 10 जणांवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
पोलीस पाटील श्रीकृष्ण पांडूरंग नलवडे, हणमंत पांडूरंग नलवडे, यशवंत मारूती नलवडे, राहुल मारूती नलवडे, महादेव ज्ञानू एैर, सुनिल उर्फ सोन्या राजाराम नलवडे, अनिल राजाराम एैर, सुनिल महादेव एैर, आबासो महादेव एैर, वैभव सुनिल एैर सर्व रा. हवेलीवाडी-सवादे अशी गुन्ह्यातील संशयीतांची नावे आहेत.
याबाबत अनिल राजाराम एैर यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अनिल एैर व त्यांच चुलत भाऊ सुनिल महादेव एैर हे नालगौंडी शिवारात शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उसाला पाणी पाजण्याच्या पाईप जोडण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतात तोडलेली झाडे नेण्यासाठी गावचा पोलीस पाटील श्रीकृष्ण नलवडे याने ट्रॅक्टर बोलवला होता. संजय येरळेकर हा चालक ट्रॅक्टर घेवून आला. त्याने अनिल एैर यांच्या शेतातील घास गवतातून ट्रॅक्टर नेला. त्यामुळे अनिल यांनी त्याबाबत त्याच्याकडे विचारणा केली. त्यामुळे चिडून जावून श्रीकृष्ण नलवडे याने त्याच्या हातातील कुऱ्हाडीने अनिल एैर यांच्या डाव्या हातावर मारहाण करून त्यांना जखमी केले. तर नलवडे याच्यासोबतच्या हणमंत पांडूरंग नलवडे, यशवंत मारूती नलवडे, महादेव ज्ञानू एैर यांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण व शिवीगाळ केली. तर राहुल मारूती नलवडे, सुनिल उर्फ सोन्या राजाराम नलवडे यांनी अनिल एैर यांचे चुलतभाऊ सुनिल एैर व शंकर एैर यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, असे अनिल एैर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी श्रीकृष्ण नलवडे याच्यासह सहाजणांविरूध्द गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, याप्रकरणी हणमंत पांडूरंग नलवडे यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, शेतातून ट्रॅक्टर नेल्याच्या कारणावरून सुनिल एैर यांनी कुऱ्हाडीने उजव्या हातावर मारहाण केली तर अनिल एैर, आबासो एैर, वैभव एैर यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण, शिवीगाळ केल्याचे म्हटले आहे. त्यावरून अनिल एैर यांच्यासह चौघांवर गुन्हा नोंद झाला आहे. दोन्ही गुन्ह्यांचा तपास हवालदार सुर्यकांत खिलारे करत आहेत.