सोलापुरात मतदानकेंद्रांना पावसाच्या पाण्याचा वेढा

परिसरात दलदल ः बंदोबस्तातील पोलिसांवर मंडप कोसळला

सोलापूर (प्रतिनिधी)– सोलापूर शहर आणि ग्रामीण भागात रविवारी रात्री सुरु झालेला पाऊस सोमवारी सकाळी 10 वाजेपर्यत सुरू असल्याने शहर आणि जिल्ह्यातील मतदान प्रक्रियेवर पुरते पाणी फेरले. सकाळी पहिल्या दोन तासात पावसामुळे सर्वत्र मतदान केंद्राबाहेर आणि मतदानकेंद्रात पाणी शिरल्याने केवळ 5 टक्के मतदान झाले होते. तर दहा वाजता सूर्यदर्शन झाल्यानंतर काही अंशी वेग आला. एकूणच पावसामुळे सोमवारी सकाळच्या सत्रात पुरती दाणादाण उडाली होती.

सोलापूर शहर आणि परिसरात रविवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. सकाळपर्यंत धो-धो पाऊस कोसळत होता. सम्राट चौक, शेळगी, बुधवार पेठ, दमाणी नगर सुंदराबाई हायस्कूल, पाणी गिरणी आदी ठिकाणच्या मतदानकेंद्रांवर पावसामुळे दलदल निर्माण झाली होती. तर बऱ्याच केंद्रामध्ये थेट पाणी शिरल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पाण्यात उभे राहूनच कामकाज पाहावे लागले.

ठिकठिकाणी केंद्राबाहेरील पायऱ्यासुद्धा पाण्यात असल्याने अन्य ठिकाणाहून टेबल आणून वेगळी सोय करावी लागली. शाहीर वस्ती येथील केंद्राबाहेर उभारण्यात आलेला मंडप पोलिसांच्या अंगावर कोसळला. मात्र कोणतीही हानी झाली नाही. रामवाडी येथील केंद्राबाहेरसुद्धा निसरड्या रस्त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

एकूणच शहरातील अनेक केंद्रांना पाण्याचा वेढा पडल्याने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रात्र जागून तर काढली. परंतु सकाळी मतदान सुरु झाल्यानंतरसुद्धा त्यांचे हाल कायम होते. मतदारांनासुद्धा या त्रासाला सामोरे जावे लागले.

Leave A Reply

Your email address will not be published.