पुणे -आगमन आणि प्रवास याबाबत भारतीय हवामान विभागाच्या अंदाजांना सातत्याने बगल देत, मान्सून आश्चर्यकारकरित्या आगेकूच करत आहे. अशाचप्रकारे वेगाने वाटचाल करत मान्सून नियोजित वेळेपूर्वीच विदर्भात दाखल झाला आहे.
येत्या आठवडाभरापूर्वीच मान्सून संपूर्ण राज्य व्यापेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. हवामान विभागातर्फे मान्सूनबाबत सातत्याने अंदाज दिले जातात. मात्र, यंदा या अंदाजाला काहीसे खोडून काढत मान्सूनचा अकल्पित प्रवास सुरू आहे. यापूर्वी मान्सून केरळात वेळेवर दाखल होणार असे सांगितले जात असताना मान्सून दोन दिवस उशिराने केरळात पोहचला.
त्यानंतर काहीसा रेंगळण्याची शक्यता असताना, अतिशय वेगाने प्रवास करत मान्सूनने अवघ्या 48 तासांत महाराष्ट्रापर्यंत मजल मारली. हा प्रवास असाच वेगाने सुरू राहील, असे वाटत असतानाच पुण्यात दाखल झाल्यावर मान्सूनने काही काळ विश्रांती घेतली.
मात्र, त्यानंतर लगेचच मुंबईसह विदर्भ व्यापून, दक्षिण गुजरातमधील काही भाग, तेलंगणा व आंध्र प्रदेशचा काही भाग, मध्य खाडीचा बहुतांश भाग व्यापत पुढील प्रवासास मान्सून सज्ज झाला आहे.
याच वेगाने मान्सूनचा प्रवास सुरू राहिल्यास 15 जूनपूर्वी तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल. त्याचबरोबर गुजरातचा आणखी काही भाग, तेलंगणा व आंध्र प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, संपूर्ण पश्चिम बंगाल, बिहार आणि पूर्व उत्तर भागातील काही भागांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.