पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील पाणीपुरवठ्याबाबत नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी महापालिका प्रशासनाने हेल्पलाइन सुरु केली आहे. त्या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रारींचा पाऊस आला आहे. अवघ्या 24 दिवसांमध्ये 359 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये दिवसाला साधारण 15 तक्रारी येत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. सर्वाधिक तक्रारी कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत असल्याबद्दल आहेत. यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत काळेवाडी, डांगे चौक, वाकड या भागात सर्वाधिक 91 तक्रारी असून क क्षेत्रीय कार्यालय परिसरात पिंपरी, नेहरूनगर, संत तुकारामनगर या भागात सर्वात कमी म्हणजे फक्त 24 तक्रारी आल्या आहेत.
शहरात 24 नोव्हेंबर 2019 रोजी तत्कालीन आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी शहरात दिवसाआड पाणी पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय सव्वा दोन वर्षांनंतरही अद्याप लागू आहे. यावर्षी कडक उन्हाळा असल्यामुळे नागरिकांना पाण्याची मोठी टंचाई निर्माण होत आहे. तसेच शहराच्या विविध भागात पाण्याविषयी मोठ्या प्रमाणात तक्रारी येऊ लागल्या होत्या. तसेच प्रत्येक जनसंवाद सभेमध्ये पाण्याच्याच तक्रारीचे जास्त असल्यामुळे महापालिका प्रशासनाने पाणी पुरवठ्याच्या तक्रारीसाठी 24 मार्च रोजी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली. 7722060999 हा तक्रार क्रमांक जाहीर करण्यात आला.
नागरिकांच्या आलेल्या तक्रारींवर त्वरीत कार्यवाही व्हावी, यासाठी महापालिका भवनातील क्रिडा सभापतीच्या दालनात हेल्पलाईनसाठी स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. ही हेल्पलाइन 24 तास सुरू आहे. हेल्पलाईनचे काम सकाळ, दुपार व रात्र असे तीन शिफ्टमध्ये चालते. यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हेल्पलाईनवर आतापर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागातून एकूण 359 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अ क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत 32, ब मध्ये 75, क मध्ये 24, ड मध्ये 91, ग मध्ये 50, इ मध्ये 28, फ मध्ये 38 तर ह मध्ये 25 पाण्याच्या तक्रारी आल्या आहेत. यामध्ये कमी दाबाने आणि कमी वेळ पाणीपुरवठा होत आहे. त्या संदर्भात नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.