नवी दिल्ली – सरकार आता रेल्वे परीक्षेत गुगल मॅपचा वापर करणार आहे. ऐकून तुम्हाला थोडं विचित्र वाटत असेल पण सरकार तुमच्या फायद्यासाठी हे काम करणार आहे. रेल्वे परीक्षेचे ठिकाण ठरवण्यासाठी गुगल मॅपचा वापर पहिल्यांदाच होणार आहे. परीक्षा केंद्र उमेदवारांच्या घरापासून दूर असल्याने होणारा त्रास दूर करण्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. चला सविस्तर समजून घेऊया….
परीक्षा केंद्र 300 किमीच्या आत असेल…
सरकारच्या नियोजनानुसार रेल्वेच्या परीक्षा आता 300 किमीच्या परिघातच होणार असून त्यासाठी गुगल मॅपचा वापर केला जाणार आहे. रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) आता विद्यार्थ्यांच्या घराच्या पत्त्यानुसार केंद्र ठरवेल आणि कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्र विद्यार्थ्याच्या निवासस्थानापासून 300 किमीच्या त्रिज्येमध्ये ठेवले जाईल.
या निर्णयावर भाष्य करताना रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्ही प्रत्येक उमेदवाराचा पिन कोड त्यांच्या निवासस्थानापासून 300 किमीच्या आत असलेल्या परीक्षा केंद्राशी गुगल मॅपद्वारे जोडत आहोत. त्याच बरोबर आम्ही हे सुनिश्चित करत आहोत की उमेदवारांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यासाठी बस आणि रेल्वे यांसारख्या वाहतुकीचे पर्याय सहज उपलब्ध असतील.
नवीन नियमानुसार 30 जुलै 2022 रोजी परीक्षा होणार
30 जुलै रोजी होणारी लेव्हल 6 आणि लेव्हल 4 ची संगणक चाचणी नवीन निर्णयानुसार सुरू होणार आहे. यामध्ये, सुमारे 90 केंद्रांवर सुमारे 60,000 उमेदवार 7,026 पदांसाठी परीक्षेला बसतील. या परीक्षेत बसलेल्या 99 टक्के उमेदवारांना 300 किमीच्या आत केंद्र देण्यात आले आहे, तर 100 टक्के महिला उमेदवारांना 400 किमीच्या आत केंद्र देण्यात आले आहे. नुकत्याच पार पडलेल्या रेल्वे परीक्षेत दूरचे केंद्र भेटल्याने विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती.