क्यूआर कोडद्वारे रेल्वेस्थानकांवर होणार चेक-इन
नवी दिल्ली – भारतातील अंदाधुंद वाटणाऱ्या रेल्वेस्थानकावर आता आमूलाग्र बदल होणार आहेत. प्रवाशांना विमानतळाप्रमाणे क्यूआर कोड स्कॅन करून रेल्वेस्थानकात प्रवेश दिला जाणार आहे.
रेल्वेने मोठ्या प्रमाणात डिजिटायझेशन केल्यामुळे हे शक्य होणार आहे. अशा प्रकारचा पायलट प्रकल्प प्रयागराजमध्ये यशस्वी झाला आहे. रेल्वे मंडळाचे अध्यक्ष व्ही. के. यादव यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, सध्या एकूण तिकीट विक्रीच्या 85 टक्के तिकिटे ऑनलाईन बुक होतात. त्या तिकिटावर क्यूआर कोड असेल. तिकीट खिडकीतून तिकीट घेतले तरी या प्रवाशाला मेसेज पाठविला जाईल. त्यामध्ये असलेली लिंक क्लिक केल्यानंतर क्यूआर कोड दिसेल.
रेल्वेस्थानकावर चेक इन काऊंटर तयार केले जातील, क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर संबंधित प्रवाशाला प्रवेश मिळेल. ही सर्व माहिती तिकीट चेक करणाऱ्यांना लगेच उपलब्ध होईल. त्यामुळे रेल्वेस्थानकावरील आणि रेल्वेतील कर्मचाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. त्यासाठी रेल्वेच्या सर्व व्यवस्थेचे डिजिटायझेशन करण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात चालू आहे. जर हा प्रयोग यशस्वी झाला तर भारतातील रेल्वे प्रवासामध्ये आमूलाग्र बदल होणार आहे. या पद्धतीमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या शून्य होणार आहे. त्याचबरोबर स्थानकावरील अनावश्यक गर्दी पूर्णपणे संपुष्टात येणार आहे.
सॅटेलाइटद्वारा रेल्वेकडे लक्ष
भारतीय रेल्वेने भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोबरोबर सहकार्य करार केला आहे. इस्रोने अवकाशात पाठवलेल्या उपग्रहाद्वारा भारतात विविध मार्गावर असलेल्या रेल्वेची पाहणी निरंतर केली जाणार आहे. त्यामुळे अपघात कमी होण्यास त्याचबरोबर कोणत्या रेल्वेचा वेग कमी झाला आहे हे समजण्यास मदत होणार आहे. रेल्वेची एकूणच कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याचे यादव यांनी सांगितले.