लोणी काळभोर (वार्ताहर) – घरी जाताना चुकीच्या रेल्वेत बसल्यानंतर लोणी काळभोर येथील रेल्वे स्थानकात गडबडीत खाली उतरताना पाय घसरून पडल्याने महिला गंभीर जखमी झाली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 4) सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.
मनीषा हेमचंद्र बनकर (अंदाजे वय. 40, टीसी कॉलेजच्या जवळ, बारामती) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांच्यावर लोणी काळभोर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मनीषा बनकर या कामानिमित्त लोणी काळभोर येथे रहात असलेल्या एका नातेवाईकाकडे आल्या होत्या. त्यांचे काम झाल्यानंतर त्या पुन्हा घरी रेल्वेने निघाल्या होत्या. लोणी काळभोर रेल्वे स्थानकावर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास आल्या होत्या.
यावेळी लोणी काळभोर रेल्वे स्थानकात पुण्याकडून बारामतीकडे व बारामतीकडून पुण्याकडे जाणार्या दोन्ही गाड्यांची स्पीकरवरून एकदाच माहिती देण्यात आली. दोन्हीही गाड्या काही अंतराच्या फरकाने फलाट क्रमांक 1 वर येणार असल्याचे सांगण्यात आले होते.
मात्र, बारामतीकडून पुण्याकडे जाणारी गाडी सर्वात प्रथम आल्याने बनकर यांचा गोंधळ झाला आणि त्या गाडीत बसल्या. त्यानंतर मनीषा यांच्या लक्षात आले की, आपण बसलेली रेल्वे ही बारामतीच्या दिशेने नव्हे तर पुण्याच्या दिशेने चालली आहे. तेव्हा मात्र रेल्वे सुरु झाली होती. आपण चुकीच्या रेल्वेत बसल्यानंतर मनीषा यांनी तातडीने खाली उतरण्याच्या प्रयत्न केला. मात्र, रेल्वेतून उतरताना त्यांचा पाय घसरून त्या फलाटावर पडल्याने गंभीर जखमी झाल्या.
इतर रेल्वे स्थानकावर पुण्याहून दौंड कडे आणि दौंडहून पुण्याकडे जाणार्या सर्व गाड्या वेगवेगळ्या फलाटावर थांबतात. मात्र, लोणी काळभोर रेल्वे स्थानक असे एकमेव स्थानक आहे की, या ठिकाणी दोन्ही दिशेकडे जाणार्या गाड्या एकाच फलाटावर येतात. यामुळे प्रवाशांचा गोधळ उडतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या वेळेत दोन्ही फलाट रिकामे ठेवावेत व गाड्या संबंधित दिशेच्या फलाटावर घ्याव्यात. – अनिल शिंदे, रेल्वे प्रवासी संघटना, लोणी काळभोर