पिंपरी – शिवसेना पक्ष शिस्तीचा भंग आणि पक्ष आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत राहुल कलाटे यांना शिवसेना गटनेते पदाचा राजीनामा देण्याचा आदेश शिवसेना भवनातून दिला असल्याची चर्चा आज दिवसभर पालिका वर्तुळामध्ये रंगली होती.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सदस्यपदी नुकतीच आठ सदस्यांची निवड झाली. शिवसेनेच्या कोट्यातून अश्विनी चिंचवडे यांचे नाव पक्षाने दिले होते. मात्र, गटनेते राहुल कलाटे यांनी आपल्या समर्थक असलेल्या मीनल यादव यांचे नाव स्थायी समितीसाठी दिले. त्यावरुन शहरातील शिवसेनेचा एक गट आक्रमक झाला होता. त्यांनी थेट पक्षश्रेष्टींकडे तक्रार करत याबाबत न्याय मागितला.
आपण शिवसेना पक्ष शिस्तीचा भंग केला आहे. पक्षाचे आदेश न पाळता वेगळाच अजेंडा राबवत आहात. त्यामुळे आपण महापालिका शिवसेना गटनेतेपदाचा राजीनामा त्वरित महापौर, विभागीय आयुक्तांकडे द्यावा, असा आदेश शिवसेना भवनातून कलाटे यांना दिला गेल्याचे सांगितले जात आहे. यावरून आज महापालिकेमध्ये विविध चर्चा रंगल्या होत्या. याबाबत शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांच्या संपर्क साधला असता त्यांनी फोन घेतला नाही.