वाशिम – राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढताना दिसून येत आहे. त्यातही विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पुन्हा लॉकडाऊन केला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये करोनाचे निर्बंध अधिक कडक केले आहे. अशातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरातील आदिवासी निवासी शाळेमधील 327 पैकी 229 विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे.
याशिवाय या निवासी शाळेतील 4 कर्मचाऱ्यांनाही संसर्ग झाला आहे. हे विद्यार्थी पाचवी ते नववी इयत्तेतील आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातील 151, यवतमाळमधील 55, बुलडाणा जिल्ह्यातील 3, हिंगोली जिल्ह्यातील 8 आणि वाशिम जिल्ह्यातील 11 विद्यार्थ्यांचा समावेश आहे. हे सर्व विद्यार्थी 14 फेब्रुवारी रोजी शाळेत दाखल झाले होते.
दरम्यान, सर्व विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात आल्यानंतर संसर्गाचा उलगडा झाला आहे. निवासी शाळेमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरल्याचे सांगितले जात आहे.