नवी दिल्ली – राहुल गांधी उतरणार गुजरातच्या मैदानात, कॉंग्रेस नेते राहुल गांधी विधानसभेच्या निवडणुकीत कॉंग्रेसचा प्रचार करण्यासाठी गुजरातला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. कॉंग्रेसमधील उच्चस्तरीय सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, कन्याकुमारी ते काश्मीरदरम्यान “भारत जोडो’ यात्रेत व्यस्त असलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी निवडणुकीच्या प्रचारासाठी गुजरातला जाणार आहेत. 21 आणि 22 नोव्हेंबर रोजी ते सौराष्ट्र आणि अन्य भागात प्रचार सभा घेणार आहेत. यासोबतच प्रियंका गांधी-वढेरासुद्धा सोबत जाणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वीकारले जी-20चे अध्यक्षपद, म्हणाले, “ही प्रत्येक भारतीयासाठी…”
2017 मधील गुजरातच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी धुंवाधार प्रचार केला होता. प्रत्येक मंदिरात जाऊन त्यांनी पूजा केली होती. त्यावेळेस कॉंग्रेसला 77 जागांवर विजय मिळाला होता. मात्र, गुजरातच्या या निवडणुकीपासून त्यांनी स्वत:ला लांब ठेवले आहे. 3500 किलोमीटरच्या पदयात्रेत ते सध्या व्यस्त आहेत. याच कारणामुळे हिमाचल प्रदेशातही त्यांनी प्रचार केला नव्हता. परंतु, आता ते गुजरातला प्रचारासाठी जाणार आहेत.
यामुळे भारत जोडो यात्रेच्या पूर्वनियोजित कार्यक्रमात थोडा बदल केला जाणार असल्याची माहिती आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा 20 नोव्हेंबरच्या रात्री मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यातील कराली गावात प्रवेश करणार आहे. याच ठिकाणी ते रात्रीची विश्रांती घेणार आहेत. याच ठिकाणाहून राहुल गांधी 21 नोव्हेंबर रोजी गुजरातला जाणार आहेत.
दोन दिवस प्रचार केल्यानंतर 23 नोव्हेंबर रोजी पुन्हा यात्रेत सामील होतील. आधी 22 नोव्हेंबरला सकाळी यात्रा सुरू होणार होती आणि 26 नोव्हेंबरला इंदूरमध्ये दाखल होणार होती. परंतु, आता यात बदल केला जात आहे. राहुल गांधी यांचा गुजरातमधील कार्यक्रम निश्चित करण्यासाठी कॉंग्रेस नेते दिग्विजय सिंग आज अहमदाबादला गेले आहेत. राज्यतील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून ते प्रचाराचा कार्यक्रम ठरविणार आहेत.