वाघोली (पुणे) – वाडेबोल्हाई (ता. हवेली) येथील रघुनाथ खंडू गावडे यांची आयएएस पदी पदोन्नती झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमधून उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली होती. त्यानंतर महसूल विभागात त्यांनी विविध ठिकाणी काम केले. नाशिक येथे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांची प्रथम नियुक्ती, शासनाचा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सरदार सरोवर प्रकल्पाचे पुनर्वसन अधिकारी म्हणून तळोदा जि.नंदुरबार येथे करण्यात आली. तेथे त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला.
सन 2001 मध्ये नाशिक जिल्ह्यातील निफाड येथे प्रांताधिकारी पदावर नेमणूक झाली. या काळात मा. राष्ट्रपती, मा. पंतप्रधान यांच्या विविध दौऱ्यांसमयी ओझर विमानतळ येथे राजशिष्टाचार व त्या संबंधातील कामे त्यांनी चोखपणे पार पाडली. 2006 ते 2010 या कालावधीत त्यांनी नाशिक विभागात एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.
2011 ते 2014 या कालावधीत त्यांनी अपर जिल्हाधिकारी, मालेगाव या अतिशय संवेदनशील व महत्वाच्या पदावर काम केले. महाराष्ट्र शासनाने सन 2014 साली नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी मेळा अधिकारी पदावर नियुक्ती केली. 2014 ते 2016 या कालावधीतील हा कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडला. सदर उत्कृष्ट नियोजनाची दखल अमेरिका देशात देखील घेतली गेली. या उत्कृष्ट कामासाठी महाराष्ट्र शासनाने त्यांना विशेष पुरस्काराने सन्मानित केले.
2017-2020 या कालावधीत त्यांनी नाशिक येथील विभागीय आयुक्त कार्यालयात उपायुक्त (महसूल) व उपायुक्त (सामान्य प्रशासन) या पदावर काम केले. या संपूर्ण सेवाकाळातील पंचवीस वर्षांमध्ये त्यांनी केलेल्या लोकाभिमुख कामाची दखल घेऊन महाराष्ट्र व केंद्र शासनाने त्यांची आयएएस पदी पदोन्नती केली आहे. या कालावधीत त्यांना त्यांचे बंधू विठ्ठल खंडू गावडे व पत्नी रूपाली यांची मोलाची साथ लाभली. त्यांच्या पदोन्नतीमुळे वाडेबोल्हाई गाव व पंचक्रोशीमधील नागरिक तसेच संपूर्ण हवेली तालुक्यात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. गावडे यांच्यावर विविध मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.