नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फ्रांसच्या बॅस्टील डे परेड मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली, त्यावरून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. भारताने फ्रान्समधून राफेल विमाने खरेदीचा करार केला असल्याने त्या आधारावर त्यांना या परेडचे तिकीट मिळाले आहे अशी टीका त्यांनी ट्विटरवर केली आहे.
राहुल गांधी यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, मणिपुर जळते आहे, युरोपियन युनियनच्या संसदेत त्यावर चिंता व्यक्त करणारा ठराव झाला आहे. पण मोदी अजून मणिपूरविषयी मौनात आहेत. आणि दरम्यान त्यांना नौदलासाठी राफेल विमान खरेदीचा करार केल्याने बॅस्टील डे परेडचे तिकीट मिळाले आहे.
मणिपुर मधील स्थिती बाबत मोदी सरकारने किंवा खुद्द मोदींनी कोणतीही प्रतिक्रिया अजून दिलेली नाही. किंवा मोदी तिकडे फिरकलेही नाहीत. गेल्या दोन महिन्यांहून अधिक काळ मणिपुरात हिंसाचाराचा आगडोंब पसरला आहे. मोदी विदेशात फिरत आहेत पण त्यांना मणिपूरला जायला वेळ नाही. त्यावरून कॉंग्रेसने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनीम म्हटले आहे की, आम्ही चंद्रावर निघालो आहोत पण आम्हाला अंतर्गत स्थितीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. तेथील स्थितीबाबत चिंता व्यक्त करणारा ठराव युरोपियन संसदेतही संमत झाला आहे. दरम्यान भारत सरकारने या ठरावावर टीका केली आहे. युरोपियन युनियनचा हा ठरावर त्यांच्या अद्यापही असलेल्या वसाहतवादी मानसिकतेचे लक्षण आहे असे भारतीय परराष्ट्र व्यवहार खात्याने म्हटले आहे.