Radhika Apte : बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने मराठीसह बॉलीवूड चित्रपटात देखील काम केले आहे. याशिवाय ती तिच्या स्पष्टवक्तेपणामुळे देखील ओळखली जाते. सध्या राधिकाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात राधिकाने तेलुगू फिल्म इंडस्ट्रीबाबत भाष्य केले आहे. तेलुगू फिल्म इंडस्ट्रीमध्ये पुरुषांचं वर्चस्व असल्याचे यात राधिका म्हंटल्याचे दिसून येते. मात्र तिचे हे विधान नेटकऱ्यांच्या पसंतीस पडलेले नाही. यावरून नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये राधिका तेलुगू चित्रपटसृष्टीबद्दल बोलताना दिसते “तेलुगू इंडस्ट्री ही अशी इंडस्ट्री आहे जिथे मी सर्वात जास्त संघर्ष केला आहे.कारण ती इंडस्ट्री अतिशय पितृसत्ताक आहे. एक प्रकारे ती चित्रपटसृष्टी पुरुषप्रधान आहे. तिथे महिलांना ज्या पद्धतीने वागवले जाते ते असह्य आहे. चित्रपटांतील महिलेची भूमिका ही ‘पती हा माणूस देवासारखा आहे’, असं म्हणणारी असते, ” असे राधिका म्हणते.
Radhika Apte blasting Tollywood 😐
— Christopher Kanagaraj (@Chrissuccess) February 16, 2024
पुढे ती म्हणते की, “सेटवर तुम्हाला तिसऱ्या व्यक्तीप्रमाणे वागवले जाते. तो अभिनेता कलाकारांना काही विचारत नाही. अभिनेता सध्या चांगला मूडमध्ये नाही आणि त्याला चहा प्यायचा आहे, असे सेटवर सांगण्यात येते. यामध्ये मी सतत संघर्ष केला आहे आणि आता मी ते सोडून दिले आहे. मला असे वाटते की, हे फक्त माझ्यासोबतच घडत आहे.” परंतु सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला राधिकाचा हा व्हिडिओ जुना असल्याचे समोर आले आहे. परंतु राधिकाच्या व्हायरल व्हिडीओनंतर नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केले आहे.