आदेशाचा पुनर्विचार करण्यास हायकोर्टाचा नकार
मुंबई (प्रतिनिधी) – बकरी ईदनिमित्ताने देण्यात येणारी कुर्बानी सोसायटीच्या फ्लॅटमध्ये तसेच सोसायटीच्या आवारात मनाई करण्याच्या आदेशाचा पुनर्विचार करण्यास उच्च न्यायालयाने स्पष्ट शब्दांत नकार दिला. पालिका या कुर्बानीसाठी सज्ज असल्याने न्यायालयाने याचिकाकर्त्यांनी दिलासा देण्यास नकार दिला.
दोन दिवसांपूर्वी न्यायालयाने बकरी ईदनिमित्ताने देण्यात येणारी कुर्बानी सोसायटीच्या फ्लॅटमध्ये तसेच सोसायटीच्या आवारात मनाई करताना कुर्बानीची अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या सामुदायिक केंद्रापासून एक किलोमीटरच्या परिसरात सोसायटींनाही परवानगी देऊ नका, असे निर्देश महापालिकेला दिले होते.
मात्र, मुंबई उपनगरांत सार्वजनिक कुर्बानीसीठी पुरेशी सुविधा नसल्याचा दावा करत गुरुवारी काही मुस्लीम समाजाच्या याचिकाकर्त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा धाव घेऊन न्यायालयाने आपल्या आदेशांचा पुनर्विचार करावा अशी विनंती करणारी याचिका दाखल केली. या याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती गौतम पटेल यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.