देहूगाव -तीर्थक्षेत्र देहू येथील संत तुकाराम महाराज मुख्य मंदिरात श्रीक्षेत्र पंढरपूर कार्तिकी एकादशीनिमित्त सोमवारी (दि. 15) भाविक-भक्तांनी पहाटेपासूनच गर्दी केली. देहूरोड पोलीस ठाण्याच्या वतीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
करोना महामारीमुळे मंदिर बंद होते. सध्या लॉकडाउन शिथील करण्यात आले आहे. धार्मिक स्थळे, मंदिरे खुली करण्यात आली आहेत. त्यामुळे तीर्थस्थळे धार्मिक स्थळांच्या दर्शनार्थ भाविक बाहेर पडू लागले आहेत.
तीर्थक्षेत्र पंढरपूर कार्तिकी एकादशी असल्याने तीर्थक्षेत्र देहूत येणाऱ्या भाविकांना रांगेतून दर्शन घेता यावे यासाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने दर्शनबारीचे नियोजन करण्यात आले होते. श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मास्क लावण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात येत होते.
मंदिरामध्ये आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती. मूळचे उस्मानाबाद, सध्या राहणार इंदोरी येथील कृष्णा पांचाळ याने मंदिरामध्ये श्री संत तुकाराम महाराज, श्री संत ज्ञानेश्वर महाराज, मुक्ताबाई आणि श्री पांडुरंग यांचे प्रतिकात्मक रेखाटलेली रांगोळी भाविकांना आकर्षित करत होती. कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.