कर्ज वाढीला जबाबदार असणाऱ्या ‘शुक्राचार्याला’ बाजूला करा – शरद पवार

अकोले (प्रतिनिधी) – अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज वाढीला जबाबदार असणाऱ्या शुक्राचार्याला बाजूला करा. ते काम केल्यानंतर भरकटलेला हा कारखाना आपण मूळ रस्त्यावर आणू. त्यासाठी आपले सर्व सहकार्य राहील. अशी निःसंदिग्ध ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज दुपारी शेंडी-भंडारदरा येथे बोलताना दिली. एके प्रकारे अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचाराचा शुभारंभ त्यांनी केला.असा त्यात सूर होता.

झालेल्या कार्यक्रमात वक्त्यांची भाषणे झाली. त्यातील हसन मुश्रीफ व मधुकरराव नवले यांच्या भाषणाचा अपवाद वगळता माजी मंत्री मधुकरराव पिचड हेच टीकेचे मूळ केंद्रबिंदू होते. त्यांच्या भाषणाचा संदर्भ घेऊन शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यामध्ये साखर निर्मिती बरोबर वीज तयार करता येते. अल्कोहोल तयार करता येते आणि विशेष बाब म्हणजे सीएनजी गॅस सुद्धा निर्माण करता येतो याची आठवण करून दिली.

कारखानदारीचा नीट अभ्यास करा. शेतकरी हिताशी तडजोड करू नका असे आवाहन करून तालुक्यातील कोणताही विकास प्रश्न सोडवणूक करण्यासाठी आपली जबाबदारी आहे असे स्पष्ट करून कालच्या विधानसभा निवडणुकीत अशोक भांगरे व किरण लहामटे यांनी एकजूट दाखवली. त्यामुळेच आणि त्यामुळेच निवडणुकीत लोकांनी परिवर्तन केले. याकडे पवार यांनी लक्ष वेधले आणि तो समंजसपणा कायम टिकला पाहिजे अशाप्रकारची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

विकासाच्या कामी बांधीलकी डॉक्टर किरण लहामटे यांनी दाखवली.त्यामुळेच अकोले विधानसभा मतदारसंघात आमदार म्हणून ते विजयी झाले. हे त्यांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे यावर भाष्य करून, देणारा कोण होता ? आणि त्याचा फायदा कोणी उचलला असा जाहीर सवाल माजी मंत्री मधुकरराव पिचड यांचा उल्लेख नामोल्लेख न करता पवार यांनी त्यांना मंत्री केले, विरोधी पक्ष नेते केले, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले आणि तरीही ते साथ सोडून गेले अशा शब्दात त्यांनी नाराजी व्यक्त केली. 

मागील निवडणुकीत ज्यांच्या ज्यांच्या अंगात आले, ती सर्व मंडळी एकेक करून आपली साथ सोडून गेली. पण सर्व गेल्याने फरक पडला नाही. असा खोचक टोला लगावून १९८0 साली ५६ पैकी ५0 आमदार आपल्याला सोडून गेले होते त्यातील अठ्ठेचाळीस आमदार नंतर पराभूत झाले याची त्यांनी आठवण करून दिली.

पालकमंत्र्यांनी आपल्या देखत अकोले तालुक्याच्या विकासाचा शब्द दिला आहे. त्यामुळे त्यांच्याबरोबर आपलीही जबाबदारी वाढली आहे.तेव्हा कार्यकर्त्यांनी, जनतेने अडथळे, अडचणी आपल्याला सांगाव्यात. त्यासाठी आपण मुख्यमंत्री,मंत्री यांच्याकडे शब्द टाकून रखडलेली कामे निश्चितपणे मार्गी लावू असे त्यांनी जाहीर केले.

या भागात करावयाची गुंतवणूक, इको सेन्सिटिव्ह झोन, पवनचक्क्या उभारणी यांचा उल्लेख करताना त्यांनी ज्यांची जमीन  मूळ प्रकल्पात जाते त्या सर्व शेतकऱ्यांना सर्व बाजूंनी मदत केली पाहिजे. मूळ मालकच हा खरा लाभार्थी ठरला पाहिजे अशी त्यांनी आग्रही भूमिका मांडली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.