मुंबई – सुपरस्टार ‘अल्लू अर्जुन’चा बहुप्रतिक्षीत “पुष्पा द राइज’ हा चित्रपट 17 डिसेंबरला रुपेरी पडल्यावर प्रदर्शित झाला आहे. करोना काळात सुद्धा या चित्रपटाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 300 कोटींचा टप्पा पार करत बक्कळ कमाई केली आहे.
हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून, अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदन्नाची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. सध्या चित्रपटातील पुष्पा या पात्राच्या काही खास शैली सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतायत.
यामध्ये खांदा वाकून चालणे, पाय घसरत घसरत केलेला डान्स, दाढीवरुन हात फिरवत केलेली डायॉगबाजी, बिडी पकडण्याची स्टाइल, गॉगल उतरवण्याची स्टाइल अशा अनेक गोष्टी तरुणाईला चांगल्याच भावल्या आहेत.
आता तर या “पुष्पा द राइज’ या चित्रपटाचा मराठी व्हर्जन ट्रेलर सुद्धा ‘खास रे’ या मराठी युट्यूब चॅनेलवरुन शेअर करण्यात आला आहे. ‘खास रे’ हे सोशल मीडियावर आपल्या भन्नाट क्रिएटीव्हिटीसाठी ओळखले जातात. सध्या पुष्पाचा मराठी व्हर्जन ट्रेलर चांगलाच व्हायरल असून, अनेकांनी पसंती दिली आहे.
या चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांमधील काही दृष्य वापरुन त्यावर मराठी संवाद डब करुन ट्रेलरला झणझणीत तडका दिलाय. ‘जर तुमच्या हातात बंदुकी हायत तर आमच्या हातात बी कुऱ्हाडी हायत. वेळ आल्यावर गुच्चा बसणारच,’ या संवादापासून या मराठमोळ्या ट्रेलरला सुरुवात होते.
यानंतर चित्रपटामध्ये दाढी खालून हात फिरवून ‘झुकेगां नही मैं’ म्हणणाऱ्या डायलॉगमध्येही मराठमोळं व्हेरिएशन आणलं आहे. ‘पुष्पा पुष्पाराज एकटाच बसं समद्यांना…’ म्हणत अल्लू अर्जुन दाढीवरुन हात फिरवताना दिसतोय. तसेच ‘ए बेटा ये मेरा अड्डा’ गाण्यामध्ये व्हेरिएशन आणत, “ए बिट्टा हा आहे आमचा अड्डा… मी आहे लयी येडा” असे शब्द वापरण्यात आलेत.
‘खास रे’ या युट्यूब चॅनेलवरुन हा व्हिडिओ 19 जानेवारी रोजी अपलोड करण्यात आला होता. काही तासांमध्येच त्याला तब्बल 20 हजारांच्या आसपास व्ह्यूज मिळाले आहेत. त्यांच्या मराठी प्रयोगाला अनेकांनी पसंती दिली असून, कमेंट मध्ये.. तुम्हीच संपूर्ण मराठी चित्रपट डब करा…. असा सल्ला दिला आहे.