सातारा – सातारा जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. या बालेकिल्ल्यात सहा नगरपंचायतींच्या निवडणुकीत चार नगरपंचायती राष्ट्रवादीने आपल्याकडे राखल्या आहेत. दहिवडी, पाटण, खंडाळा, लोणंद नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादीने विरोधकांना धूळ चारली.
कोरेगाव नगरपंचायतीत मात्र शिवसेनेच्या आ. महेश शिंदे गटाने राष्ट्रवादीच्या आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाला धूळ चारून, 17 पैकी 13 जागांवर बाजी मारली. वडूजमध्ये भाजपचे आ. जयकुमार गोरे यांच्या पॅनेलने वर्चस्व मिळवले असले तरी चार अपक्षांच्या भूमिकेला महत्त्व आले आहे.
जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींमध्ये प्रत्येकी 13 प्रभागांसाठी 21 डिसेंबर 2021, तर उर्वरित चार प्रभागांसाठी काल (दि. 18) मतदान झाले. सर्व जागांची एकत्रित मतमोजणी त्या त्या नगरपंचायत क्षेत्रात बुधवारी होऊन, निकाल जाहीर करण्यात आला.
अपेक्षेप्रमाणे राष्ट्रवादीने दहिवडी, पाटण, खंडाळ्यात बाजी मारली. पाटणमध्येही राष्ट्रवादीच्या विक्रमसिंह पाटणकर गटाची सत्ता कायम राहिली. या गटान 17 पैकी 15 जागा जिंकून पारंपरिक प्रतिस्पर्धी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला धूळ चारली. जिल्हा बॅंकेनंतर ना. देसाई यांना दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का बसला आहे.
लोणंद, खंडाळ्यात आ. मकरंद पाटील गटाने प्रत्येकी दहा जागा जिंकल्या आहेत. लोणंदमध्ये भाजप व कॉंग्रेसला प्रत्येकी तीन, तर एका एका जागेचा निर्णय चिठ्ठीवर झाला. दहिवडीत भाजपच्या आ. जयकुमार गोरे गटाला राष्ट्रवादीच्या प्रभाकर देशमुख गटाने पराभवाचा धक्का दिला. तेथे राष्ट्रवादीला आठ, भाजपला पाच, शिवसेनेला तीन व एक अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. वडूजमध्ये आ. गोरे गट आणि
राष्ट्रवादीमध्ये कडवी झुंज झाली. आ. गोरे गटाला सहा व राष्ट्रवादीला पाच जागा मिळाल्या असून, चार अपक्ष निवडून आले आहेत. कॉंग्रेसला एक जागा मिळाली. कोरेगावात आ. महेश शिंदे गटाने आ. शशिकांत शिंदे यांच्या गटाचा 13 विरुद्ध 4 असा पराभव केला. जिल्ह्यात राष्ट्रवादीने बाजी मारली असली, तरी प्रतिष्ठेला तडे गेल्याचे दिसत आहे.
भाजपचा लढाऊ बाणा
खंडाळा दहिवडीतील नगरपंचायतीत भाजपने जागा कमी मिळवल्या असल्या तरी राष्ट्रवादीला दिलेली टक्कर चर्चेत राहिली. सातारा जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात भाजप सातत्याने आपली ताकद वाढवत आहे. या निकालांनीसुद्धा भाजपने केलेला राजकीय संघर्ष चर्चेत राहिला असून जिल्ह्याच्या पूर्व भागात आमदार जयकुमार गोरे यांचे नाणे खणखणीत वाजले आहे. वडूज नगरपंचायतीत भाजपच सर्वाधिक मोठा गट ठरला. माण तालुक्याच्या राजकारणात राष्ट्रवादीला बॅकफूटवर ठेवण्यात जयकुमार पुन्हा यशस्वी झाले. मात्र सत्ता स्थापनेच्या प्रक्रियेत त्यांना अपक्ष उमेदवारांना चुचकारावे लागणार आहे.
शशिकांत शिंदे यांना स्ट्रॅटेजी बदलावी लागणार
राष्ट्रवादीचे लढवय्ये आमदार शशिकांत शिंदे यांच्या राजकीय प्रतिष्ठेची विमान जिल्हा बॅंकेच्या नंतर पुन्हा एकदा कोरेगाव नगरपंचायतीच्या निकालाने जमिनीवर आणले आहे. आमदार महेश शिंदे यांनी
सुसंघटितपणे प्रचार यंत्रणा राबवून कोरेगाव मध्ये महेश शिंदे यांचे नाणे चालते हे दाखवून दिले. आमदार शशिकांत शिंदे यांना पुन्हा एकदा जनतेत जाऊन काम करावे लागेल असे चित्र आहे. गेल्या दहा वर्षाचा मिळवलेला जनाधार आणि विश्वासार्हता याचे राजकीय गणित कुठे चुकते आहे हे तपासावे लागेल.