सिंधुदुर्ग – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला असणाऱ्या सिंधुदुर्गात भाजपला मोठा धक्का बसला आहे. कुडाळ नगरपंचायत महाविकास आघाडीच्या ताब्यात गेली आहे. त्यामुळे राणे समर्थकांना मोठा धक्का बसला आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदासाठी आज मतदान पार पडले. यात कुडाळ नगराध्यक्षपदी कॉंग्रेसच्या आफ्रीन करोल यांची निवड झाली आहे. करोल यांना 9 मते, तर भाजपच्या प्राजक्ता बांदेकर यांना 8 मते पडली. अवघे दोन नगरसेवक असलेल्या कॉंग्रेस पक्षाचा नगराध्यक्ष बनला आहे. तर उपनगराध्यक्षपदी शिवसेनेचे मंदार शिरसाट यांची वर्णी लागली आहे.
कुडाळमध्ये एकूण 17 पैकी 8 जागांवर भाजप, 7 जागांवर शिवसेना आणि 2 जागांवर कॉंग्रेसचे नगरसेवक निवडून आले होते. यामुळे नगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबद्दल सर्वांना उत्सुकता होती. अखेर चमत्कार होईल हा भाजपचा दावा फोल ठरवत महाविकास आघाडीने कुडाळमध्ये झेंडा रोवला आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी सात नगरसेवक निवडून आलेल्या शिवसेनेने दोन नगरसेवक निवडून आलेल्या कॉंग्रेसला नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला. जिल्ह्यातील चार नगरपंचायत पैकी 2 भाजप, तर दोन महाविकास आघाडीकडे आहेत.
शिवसेना-भाजप कार्यकर्ते आमनेसामने
कुडाळमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी कॉंग्रेसचे नगरसेवक आणि शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासक कार्यकर्त कुडाळ नगरपंचायत येथील इमारतीत आले. त्याचवेळी शिवसेना, कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. दोन्ही बाजूंनी जोरदार शाब्दिक चकमक उडाली. त्यांच्यात धक्काबुक्की झाल्याचे सांगितले जाते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. यावेळी नगरपंचायतला छावणीचे स्वरूप आल्याचे दिसले.