नवी दिल्ली – ख्यातनाम पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मूसेवाला हत्याकांडात वापरलेली शस्त्रे पाकिस्तानातून आली होती. पाकिस्तानच्या हमीद नावाच्या शस्त्रास्त्र तस्कराने ही शस्त्रे पुरवली होती. हमीद घातक शस्त्रांचा व्यापारी असून तो दुबईत राहतो.
सरकारने सुरक्षेमध्ये कपात केल्यानंतर 24 तासांपेक्षा कमी कालावधीत, 29 वर्षीय मुसेवाला यांना गेल्या वर्षी 29 मे रोजी मानसा जिल्ह्यातील त्याच्या मूळ गावाजवळ गुंडांनी गोळ्या घालून ठार केले. मुसेवाला आणि त्यांच्या दोन साथीदारांवर 2 मिनिटे 30 सेकंद सतत गोळीबार सुरू होता. या गुन्ह्यात एके-47 रायफल वापरण्यात आल्याचे यापूर्वी सांगण्यात आले होते.
मूसेवाला यांच्यावर गोळ्या झाडण्यात आलेल्या तीन शस्त्रांमध्ये असॉल्ट रायफल एएन-94 चाही समावेश होता. या शस्त्रास्त्राच्या वापरामुळे गुप्तचर यंत्रणाही हैराण झाल्या होत्या, कारण ही असॉल्ट रायफल केवळ सशस्त्र दलांनी वापरली आहे. हमीदने लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या बुलंदशहर निवासी हस्तकाला ही शस्त्रे पुरवली होती.
गायक मुसेवाला याच्याकडे नेहमी 45 बोअरचे विदेशी पिस्तूल असायचे. मात्र आरोपींनी मूसेवालाला विदेशी पिस्तुल वापरण्याची संधीही दिली नाही. आरोपींनी आधी मुसेवाला यांच्या डोक्यावर आणि कपाळावर गोळ्या झाडल्या. आरोपींनी सिद्धूच्या कारवर समोरून आणि ड्रायव्हरच्या बाजूने सतत गोळीबार केला. मुसेवाला यांच्या डोक्याला दोन, छातीवर आणि हाताला तीन गोळ्या लागल्या ज्यात त्याचा जागेवरच मृत्यु झाला होता.