शिर्डी – “लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या महिलेने दुसऱ्या मुलीशी लग्नाला विरोध केला. यामुळे राग आलेल्या प्रियकराने चाकूने भोसकून प्रियसीचा निर्घृण खून केला. यानंतर तो स्वत:च शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाला.
येथून जवळच असलेल्या रूई शिवारातील भोपळे वस्तीवर ही दुर्दैवी घटना घडली. मृत महिला 25 वर्षांची आहे. ही महिला आपला पहिला पती व दोन मुलांना सोडून आरोपी अजय राजेंद्र म्हस्के (रा. राम सोमय्यानगर, सावळीविहीर) याच्यासोबत पती-पत्नीसारखी राहत होती. काल (रविवार) सकाळी रूई येथील भोपळे वस्तीवर अजय म्हस्के याने त्याच्या पत्नीचा खून केल्याचा कॉल 112वर आला होता. त्यानुसार पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांनी आपल्या पथकासह भोपळे वस्तीवर धाव घेतली. तेथे महिला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडलेली होती. घटनास्थळावरून तिला साईबाबा रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे डॉक्टरांनी ती मृत असल्याचे सांगितले.
दरम्यान, या घटनेतील आरोपी अजय म्हस्के हा स्वत: पोलीस स्टेशनला हजर झाला व त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. अजयचे आई-वडील त्याचे लग्न ठरवत होते. मात्र, आपले कुटुंब सोडून अजयबरोबर राहणारी ही महिला दुसऱ्या मुलीबरोबर लग्न करण्यास अजयला विरोध करत होती. या कारणावरून दोघांमध्ये वादविवाद होत असल्याने महिलेच्या त्रासाला कंटाळून तिचा धारदार हत्याराने भोकसून खून केला असल्याचे अजयने पोलिसांना सांगितले.
कडू आव्हाड यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अजयवर शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर अधीक्षक स्वाती भोर, उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ अधिक तपास करत आहेत.