चंदीगड – पंजाबमधील भगवंत मान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात एका महिलेसह आम आदमी पक्षाच्या दहा आमदारांचा शनिवारी येथे समावेश करण्यात आला. पंजाब भवन येथे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी 10 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या सर्वांनी पंजाबी भाषेत शपथ घेतली.हरपाल सिंग चीमा आणि गुरमीत सिंग मीत हैर वगळता इतर आठ आमदार पहिल्यांदाच आमदार झाले आहेत.
आमदार चीमा यांनी सर्वप्रथम शपथ घेतली आणि त्यानंतर मंत्रिमंडळातील एकमेव महिला आणि मलोतच्या आमदार डॉ. बलजीत कौर यांनी शपथ घेतली. हरभजन सिंग, डॉ. विजय सिंगला, लाल चंद, गुरमीत सिंग मीत हैर, कुलदीप सिंग धालीवाल, लालजीत सिंग भुल्लर, ब्रम शंकर जिंपा आणि हरजोत या आमदारांनीही आज मंत्रिपदाची शपथ घेतली.
मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळात 18 जागा आहेत, पण मान यांनी पहिल्या टप्प्यात केवळ दहा जणांनाच मंत्रिपदाची शपथ दिली.हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान या कार्यक्रमाला उपस्थित होते. भगवंत मान यांनी बुधवारीच मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आम आदमी पक्षाने 117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 92 जागा जिंकल्या आहेत.
मंत्रिमंडळात पक्षाने माळव्यातील पाच, माझातील चार आणि दोआबा विभागातील एका आमदारांना प्रतिनिधित्व दिले आहे. मंत्रिमंडळातील सदस्यांपैकी हरपाल सिंग चीमा हे दिरबाचे दोन वेळा आमदार आहेत आणि पक्षाचा दलित चेहरा आहे. मागील विधानसभेत ते विरोधी पक्षनेते होते.