बीड – जिल्ह्यातील आगर नांदूर येथील तरूणाने व्हाट्सअपवर स्टेटस ठेवून गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नितीन निर्मळ (वय 23 वर्ष) असे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव आहे. धुलिवंदन सणाच्या दिवशीच घडलेल्या घटनेने गावावर शोककळा पसरली आहे. ‘गुडबाय माय जिगरी’, ‘शेवट’, असे व्हाट्सअप स्टेटस त्याने आत्महत्या करण्यापूर्वी ठेवले होते.
नितीनने ठेवलेले स्टेटस पाहून त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेतला असता गावाजवळच एका लिंबाच्या झाडाला नितीनने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीनने काल सकाळी धुळवड साजरी केली आणि दुपारच्या वेळी अचानक आपल्या व्हॉट्सअॅप ‘गुडबाय माय जिगरी’, ‘शेवट’, असे स्टेटस ठेवले. नितीनच्या काही मित्रांनी स्टेटस पाहून याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली. त्यानंतर मित्रांनी आणि नातेवाईकांनी शोध सुरु केला. काही वेळाने गावाजवळील गायरानातील एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. पोलिसांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. दरम्यान नितीनने व्हॉट्सअॅपवर असे स्टेटस कोणामुळे ठेवलं आणि आत्महत्या का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत.
दरम्यान, बीडच्या माजलगावात मागच्या महिन्यात एकाच दिवशी तिघांनी आत्महत्या केली होती. नैराश्यातून तिघांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मृतांमध्ये एका शिक्षकाचाही समावेश आहे. माजलगाव तालुक्यात एकाच दिवशी या तिन्ही घटना घडल्यामुळे तिकडे हळहळ व्यक्त केली जात होती.