चंडीगढ – माजी लष्करप्रमुख जे.जे.सिंग यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात पंजाबमध्ये ती महत्वाची राजकीय घडामोड घडली.
केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत आणि प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांच्या उपस्थितीत येथे झालेल्या सोहळ्यात सिंग यांनी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले.
याआधीच राजकारणात सक्रिय होणाऱ्या सिंग यांनी 2017 मध्ये शिरोमणी अकाली दलात (एसएडी) प्रवेश केला. त्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत ते माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विरोधात लढले. मात्र, ते पराभूत झाले. पुढच्याच वर्षी (2018) त्यांनी एसएडीला रामराम ठोकला. आता नव्या राजकीय खेळीसाठी ते भाजपमध्ये दाखल झाले आहेत. त्यांची 2005 मध्ये लष्करप्रमुखपदी नियुक्ती झाली.
ते पद भुषवणारे सिंग पहिलेच शीख अधिकारी ठरले. निवृत्तीनंतर त्यांनी अरूणाचल प्रदेशच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली. सिंग यांच्या आधी माजी लष्करप्रमुख व्ही.के.सिंह यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते सध्या केंद्रीय राज्यमंत्री आहेत. आता सिंग यांच्यावरही भाजप महत्वाची जबाबदारी सोपवणार का याविषयी उत्सुकता आहे.