चंदीगड – देशभरातील गरजु लोकांना मदत केल्यामुळे सगळीकडे नावाजलेला अभिनेता सोनू सूद यांची बहीण मालविका सूद यांनी आज पंजाबात कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही एक अत्यंत विधायक घडामोड आहे असे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष नवज्योत सिद्धु यांनी म्हटले आहे.
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांच्या उपस्थितीत त्यांनी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केला. सूद यांच्या मोगा जिल्ह्यातील घरात हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम झाला. त्यांना मोगा मतदार संघातून कॉंग्रेस तर्फे उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.
त्यांच्या पक्ष प्रवेशावेळी प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष सिद्धु आणि मुख्यमंत्री चन्नी हे दोघही उपस्थित होते. मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष यांनी एखाद्याच्या घरात जाऊन त्यांना पक्षात घेण्याचा सन्मान हा एक दुर्मिळ सन्मान आहे असेही सिद्धु यांनी म्हटले आहे.