पंजाब विधानसभा निवडणूक प्रचाराने वेग घेतला आहे. कारण काही दिवसांतच राज्यात विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत. मात्र येथे कॉंग्रेस समोरील अडचणी कमी होण्याची काहीही चिन्हे दिसत नाहीत. राज्यात जेव्हा कॉंग्रेसने मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याची घोषणा केली होती, तेव्हा असे वाटत होते की, पक्षातील अंतर्गत कलह निवळला आहे. मात्र यानंतरच मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यासाठी स्वयंघोषित दावेदार असलेले क्रिकेटर ते पुढारी बनलेले नवज्योतसिंग सिद्धू निवडणूक प्रचारातून दिसेनासे झाले आहेत.
एकीकडे सध्याचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बनवल्यानंतरच सिद्धू यांच्यात झालेला हा बदल लक्ष वेधून घेणारा आहे. मात्र आता त्यांची पत्नी नवज्योत कौर यांचेही सुर बदलले असल्याचे दिसत आहे. नवज्योत कौर सिद्धू यांनी म्हटले की, प्रचारासाठी जेथे कुठेही जावे लागेल तेथे सिद्धू जातील. मात्र पुढे त्या असे म्हणतात की, सिद्धू केवळ आपल्या स्वतःच्या जागेसाठीच प्रचार करतील. नवज्योत कौर यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले की, मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्याच्या घोषणेनंतर आता चन्नी काही मत प्रदर्शन करतील तर सिद्धू काही वेगळेच मत प्रदर्शन करतील त्यामुळे वादविवाद होऊ शकतो.
त्यामुळे सीएम फेस चन्नी यांनी आपल्या अजेंड्यानुसार प्रचार करावा. सीएम फेस घोषणेनंतर चन्नी आणि सिद्धू यांनी गळाभेट घेतली हे सर्वांनी पाहिले; पण त्यानंतर सिद्धू निवडणूक कार्यक्रम आणि प्रचारातून गायब झाले. त्यामुळे असा प्रश्न पडतो की, शेवटी सिद्धू यांची नाराजी का संपली नाही?
सिद्धू यांची मुलगी राबिया प्रचार मैदानात
दुसरीकडे, सिद्धू यांच्या प्रचारासाठी त्यांची मुलगी राबिया निवडणूक प्रचारामध्ये उतरली आहे. “जोपर्यंत माझे वडील विजयी होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही’, असेसुद्धा राबियाने म्हटले आहे. राबिया ही अमृतसर इस्ट सीट साठी वडिलांसाठी प्रचारात उतरली आहे. मी माझ्या वडिलांसाठी प्रचार करण्याचे प्रण घेतले आहे, असेही राबियाचे म्हणणे आहे.