पुणे – प्रतिभावान खेळाडूंना त्यांच्या ऑलिम्पिक वैभवाच्या शोधात पाठिंबा देण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुनीत बालन ग्रुपने प्रतिभावान कुस्तीपटू सिकंदर शेखला आर्थिक साहाय्य करण्याचा निर्णय घेतला आहे. 24 वर्षीय सिकंदर हा राज्याचा महाराष्ट्र केसरी आहे आणि त्याने 2019 मध्ये 23 वर्षांखालील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तो आता 2026 च्या आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल स्पर्धेवर लक्ष ठेवून आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी भारतीय संघात प्रवेश करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.
सिकंदरला पाठिंबा देण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना पुनित बालन ग्रुचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पुनित बालन म्हणाले,”कुस्ती हा महाराष्ट्रातील अत्यंत लोकप्रिय खेळ आहे आणि त्याने देशाला अनेक आंतरराष्ट्रीय स्टार दिले आहेत. ज्यामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक विजेता खाशाबा जाधव यांचा समावेश आहे. पुनित बालन ग्रुप भारतीय ऍथलीट्सना अत्यंत आवश्यक पाठिंबा देण्यासाठी, त्यांना त्यांच्या कारकीर्दीत वाढ करण्यास आणि देशासाठी पदके मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. सिकंदर शेख हा एक अतिशय प्रतिभावान कुस्तीपटू आहे, ज्याच्याकडे मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतासाठी पदके जिंकण्याची क्षमता आहे आणि मला विश्वास आहे की या पाठिंब्यामुळे तो त्याची सर्व स्वप्ने पूर्ण करू शकतो, असेही ते पुढे म्हणाले.
मूळचा सोलापूरचा असलेला सिकंदर याला घरातूनच कुस्तीचे बाळकडू मिळाले आहे. त्याचे वडील आणि आजोबा दोघेही कुशल कुस्तीपटू होते. सिकंदरने वयाच्या 14 व्या वर्षी कुस्तीला सुरुवात केली आणि तो कोल्हापुरातील गंडवीश तालीममध्ये प्रशिक्षण घेतले आहे. पुनित बालन ग्रुप सुरुवातीला सिकंदरचे प्रशिक्षण आणि इतर खर्च उचलून पुढील तीन वर्षांसाठी प्रति वर्ष 15 लाख रुपये मदत करणार आहे.
National Olympic Trials : विनेश फोगटला मिळणार ऑलिम्पिकचे तिकिट….
“आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक जिंकण्याचे माझे स्वप्न पूर्ण करण्यात मला मदत केल्याबद्दल मी पुनित सर आणि त्यांच्या टीमचा अत्यंत आभारी आहे. या आर्थिक पाठिंब्यामुळे मला दर्जेदार प्रशिक्षण मिळण्यास मदत होईल आणि स्पर्धांसाठी माझ्या प्रवासासाठी निधीही मिळेल,” असे सिकंदर म्हणाला.
उत्कृष्टता आणि वाढीच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रुपची वचनबद्धता परोपकार व क्रीडा जगाशी पूर्णपणे जुळलेली आहे. हा ग्रुप टेनिसपटू ऋतुजा भोसले, पॅरा-बॅडमिंटन स्टार आरती पाटील, क्रिकेटपटू अंकित बावणे आणि उदयोन्मुख तिरंदाज वैष्णवी पवार यांच्यासह जवळपास 60 प्रतिभावान खेळाडूंना क्रीडा क्षेत्रातील मदत करत आहे.