पुणे – महापालिका हद्दीतील फुरसुंगी आणि उरूळी देवाची या दोन गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याची प्रक्रिया नगरविकास विभागाने सुरू केलेली असताना आता पूर्व हडपसर-वाघोली ही स्वतंत्र महापालिका घोषित करण्याबाबत आता राज्य शासनानेच पुणे महापालिकेकडून अभिप्राय मागविला आहे. याबाबतचा अहवाल तयार करण्याचे काम अंतीम टप्प्यात आहे. हा अहवाल पुढील आठ ते दहा दिवसांत शासनास सादर करण्यात येणार आहे. मार्च अखेर तसेच इतर कारणास्तव हा अहवाल करण्यास विलंब झाला असल्याचे महापालिका प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, पुणे महापालिका प्रशासन मात्र, सर्व बाबींचा सर्वंकष विचार करून सदर अहवाल देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्य शासनाकडून गेल्या 2017 पासून महापालिका हद्दीजवळील 34 गावे पालिकेत समाविष्ट करण्याची प्रक्रीया सुरू केली. 2017 मध्ये 11 गावे महापालिकेत घेतल्या नंतर थेट 2021 मध्ये आणखी 24 गावांचा समावेश करण्यात आला. ही 34 गावे पालिकेत येण्यापूर्वी महापालिकेचे क्षेत्र 253 चौरस किलोमीटर होते ते थेट 518 चौरस किलोमीटर झाले. पुणे ही राज्यातील सर्वात मोठी हद्द असलेली महापालिका ठरली, त्यामुळे ही गावे समाविष्ट करण्यात आल्यानंतरच स्वतंत्र महापालिकेची मागणी जोर धरू लागली होती.
उरुळी-फुरसुंगीनंतर वाघोली गावानेही स्वतंत्र नगरपरिषद अथवा हडपसर-वाघोली महापालिका घोषित करण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने पालकमंत्री पाटील यांनी या गावासाठी स्वतंत्र नगरपालिका किंवा पूर्व हडपसर-वाघोली महापालिका घोषित करावी अथवा सोयी सुविधांचा विकास आराखडा तयार करून निधी द्यावा, अशी मागणी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. तर अर्थसंकल्पीय अधिवेशनात राष्ट्रवादीचे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पूर्व हडपसर महापालिका स्थापन करावी, अशी मागणी शासनाकडे केली होती. या बाबत नगरविकास विभागाने स्वतंत्र नगरपालिका आणि पूर्व हडपसर वाघोलीबाबत महापालिकेला तत्काळ अभिप्राय सादर करण्याचे आदेश नुकतेच दिले आहेत.