बिबवेवाडी – भगवान महावीर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा शांती व अहिंसेचा संदेश समाजापर्यंत पोहचावा, यासाठी रविवारी झालेल्या “अहिंसा रन’मध्ये पुणे शहरातील सुमारे 6 हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला. 3 कि.मी., 5 कि.मी. आणि 10 कि.मी. अंतरासाठी झालेल्या मॅरेथॉनमध्ये सर्वच वयोगटातील स्पर्धक सहभागी झाले होते, विशेष म्हणजे जीतो संस्थेतर्फे देशातील 65 शहर तसचे जगभरात 23 देशांत “अहिंसा रन’चे आयोजन करण्यात आल्याने याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली.
याबाबत पुणे जीतोचे राजेश सांकला यांनी सांगितले की, पुणे शहरात सर परशुरामभाऊ महाविद्यालय मैदानावरून सुरू झालेल्या “अहिंसा रन’ला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. शहरात विविध ठिकाणी झालेल्या या मॅरेथॉनमध्ये नागरिक उत्स्फुर्तपणे सहभागी झाल्याने याचे वर्ल्ड रेकॉर्ड झाले. यामध्ये पुण्यातील मॅरेथॉनमध्ये सहभाग झालेल्या सहा हजारापेक्षा अधिक नागरिकांचा वाटा सर्वाधिक ठरला आहे याचा मला विशेष आनंद आहे.
भगवान महावीर आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा शांती व अहिंसेचा संदेश समाजापर्यंत पोहचविण्यात “अहिंसा रन’ यशस्वी ठरली आहे. याच्या यशस्वी नियोजनात पुणे जीतोचे पदाधिकारी, सदस्यांचा मोठा वाटा असल्याचेही राजेश सांकला यांनी सांगितले.
पुणे ऐतिहासिक शहर आहे. पुण्याने कायमच पुढे राहुन सहभाग घेतला आहे. पुणे तिथे काय उणे ही म्हण सार्थ ठरविणारी “अहिंसा रन’ झाली. हजारो पुणेकरांनी यामध्ये धाव घेतली. जगाला अहिंसा व शांती या भगवान महावीर व महात्मा गांधी यांनी दिलेल्या विचारांची खूप गरज आहे. त्यामुळेच देशातील 65 शहरांनी व जगातील 23 देशात आयोजित केलेल्या अहिंसा रन मध्ये आज लोक धावले. याचा वर्ल्ड रेकॉर्ड बनला आहे, त्यातही पुण्याचा वाटा सर्वाधिक आहे.
– राजेश सांकला, अध्यक्ष, जीतो पुणे शहर (चॅप्टर)