* नवे करोना बाधित पुन्हा 300 पार
* निर्बंधांबाबत आज चर्चा होण्याची शक्यता
* सक्रिय बाधितांची संख्याही अडीच हजारांवर
पुणे- लॉकडाऊन शिथिल होताच शहरातील वाढलेली गर्दी आणि करोना नियमाकडे दुर्लक्ष, यामुळे सलग तिसऱ्या दिवशी करोना बाधित संख्या वाढलेली दिसून येते. आज नव्याने 333 बाधित सापडले असून, शहरातील पॉझिटिव्हिटी रेट 5.86 टक्क्यांवर पोहचला आहे.
“बाधित दर पाच टक्क्यांपुढे गेला, तर शहरात पुन्हा निर्बंध वाढवण्यात येतील,’ असे संकेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले होते. त्यामुळे शुक्रवार (दि. 25) च्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मे अखेरीस शहरातील करोना बाधित संख्येत लक्षणीय घट झाली. जूनच्या पहिल्या आठवड्यात बाधित दर 5 टक्क्यांखाली आल्यामुळे शहरातील लॉकडाऊन शिथिल करण्यात आले. त्यामुळे नागरिकांनी बाजारपेठा आणि रस्त्यांवर गर्दी केली. दुसऱ्या आठवड्यात निर्बंधामध्ये आणखी शिथिलता देण्यात आली.
दुकानांची वेळ वाढवली, जिल्हाबंदी हटवली. त्यामुळे शहरासह पर्यटनस्थळ, महामार्गांवरही गर्दी वाढली. त्यामध्ये करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होताना दिसत नव्हते. मागील पंधरा दिवसांत या वाढत्या गर्दीचे परिणाम आता दिसू लागले आहेत. सलग तीन दिवसांपासून वाढत असलेली बाधित संख्या पुणेकरांची चिंता वाढवली आहे.
गेल्या 24 तासांत बाधित संख्या वाढल्यामुळे सक्रिय बाधित संख्येत घट होण्याएवजी वाढ झाल्याचे दिसून येते. बुधवारी शहरातील सक्रिय बाधित संख्या 2 हजार 375 इतकी होती. तर त्यामध्ये आज 141 ने वाढ झाल्यामुळे शहरातील सक्रिय बाधित संख्या 2 हजार 516 वर पोहोचली आहे. त्यामध्ये 323 जणांची प्रकृती चिंताजनक असून, 461 बाधितांना ऑक्सिजन लावण्यात आला आहे.
मागील चार दिवसांपासून शहरातील मृत्यु संख्या एक आकडी असून, आज 5 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. आतापर्यंत 26 लाख 34 हजार 795 नमुने तपासणीतून 4 लाख 76 हजार 826 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये 8 हजार 554 बाधितांचा मृत्यु झाला तर 4 लाख 65 हजार 756 बाधित करोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात 187 बाधित करोनामुक्त झाले आहेत.