मुंबई -करोना संकटाच्या काळात अनेक लोक घराबाहेर पडण्यापेक्षा ऑनलाइन पद्धतीचा वापर करून आपल्याला हव्या असलेल्या वस्तू ऑर्डर करीत आहेत. सकाळच्या नाश्त्यापासून ते महिनाभराच्या किराणापर्यंत असं सर्व काही आता ऑनलाइन मिळू लागल्याने घराबाहेर पडण्याची गरज कमी झाली आहे.
मात्र ऑनलाइन खरेदी करत असताना योग्य काळजी न घेतल्यास आपली फसवणूकदेखील होऊ शकते. याचाच प्रत्यय सध्या ज्येष्ठ अभिनेत्या शबाना आझमी यांना आला.
याबाबतची माहिती स्वतः शबाना आझमी यांनी ट्विट करत दिली आहे.
आझमी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी “लिव्हिंग लिक्विड’ या ऑनलाइन मद्य विक्री करणाऱ्या संकेतस्थळावरून ऑनलाइन मद्य मागवले होते. याचे बिलदेखील त्यांनी ऑनलाइन भरले होते. मात्र यानंतर ही ऑर्डर त्यांच्यापर्यंत पोहोचलीच नाही.
आपले फोन उचलणेदेखील बंद केले, अशी कैफियत आझमी यांनी मांडली आहे. ट्विटद्वारे आझमी यांनी, आपण कोणत्या खात्यावर पैसे पाठवले याबाबतची माहितीदेखील दिली असून, इतरांना ऑर्डर करताना सावधानता बाळगा असा सल्ला दिला आहे.