“आयसीएसई’ बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर
तब्बल 34 विद्यार्थ्यांना 99.60 टक्के गुण
पुणे – द कौन्सिल फॉर द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झॅमिनेशनतर्फे (सीआयएससीई) घेण्यात आलेल्या आयसीएसईच्या (इयत्ता दहावी) परीक्षेचा 99.97 टक्के इतका निकाल लागला आहे. या परीक्षेत देश पातळीवरील गुणवत्ता यादीत चार विद्यार्थ्यांनी 99.80 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे. यात पुण्यातील कॅम्प परिसरातील सेंट मेरी स्कूलमधील हरगुण कौर माथरू हिचा समावेश आहे.
त्याचप्रमाणे या बोर्डाच्या गुणवत्ता यादीत 34 विद्यार्थ्यांनी 99.60 टक्के गुण मिळवित द्वितीय क्रमांक मिळविला. या गुणवत्ता यादीतही पुण्यातील वाकड येथील विजडम वर्ल्ड स्कूलच्या विधी चव्हाण, तर सेंट मेरीज स्कूलच्या शिवाजी देव या दोन विद्यार्थिनींचा समावेश आहे. या परीक्षेचा निकाल रविवारी सायंकाळी पाच वाजता जाहीर करण्यात आला.
देशातील 2 हजार 535 शाळांमधील 2 लाख 31 हजार 63 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. त्यात 1 लाख 25 हजार 678 विद्यार्थी, तर 1 लाख 5 हजार 385 विद्यार्थिनी होत्या. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थिंनीपैकी 99.98 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत, तर विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी 99.97 टक्के इतकी आहे.
देशात पहिला क्रमांक आल्याचा खूप जास्त आनंद वाटत आहे. करोना काळातही शाळेने ऑनलाइनद्वारे खूप चांगल्या पद्धतीने अभ्यास करून घेतला. आता पुढील शिक्षण विज्ञान शाखेत घेण्याचे ठरविले आहे.
– हरगुण कौर मथारू, सेंट मेरी स्कूल