पुणे – राज्य सरकारच्या “ब्रेक द चेन’ अंतर्गत लागू केलेली नियमावलीची अंमलबजावणी पुणे महानगरपालिकेकडून देखील करण्यात येणार आहे. या नियमावली अंतर्गत राज्य सरकारने लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना ओळखपत्रासह लोकलमध्ये प्रवास करण्याची मुभा दिली आहे. मात्र पुण्यातून ये-जा करणाऱ्या लोकल सेवेबाबत मात्र कोणताही निर्णय झाला नसल्याने, लोकल सेवा सुरू होण्याबाबत संभ्रमाचे वातावरण आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड या शहरांमध्ये आजूबाजूच्या गावांतून दररोज हजारो नागरिक रेल्वेने प्रवास करतात. मात्र सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिक, कर्मचाऱ्यांना प्रवेश देण्यात येत आहे. सध्या पुणे-लोणावळा लोकलने सरासरी 4 हजार आणि पुणे-दौंड डेमू मार्गावर सरासरी 1 हजार नागरिक दररोज प्रवास करतात. राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वांसह लोकलला हिरवा कंदील दाखवला आहे.
मुंबई येथे उपनगरीय सेवा देखील सुरू झाल्या. मात्र पुण्याहून ये-जा करणाऱ्या उपनगरीय सेवांबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लसीकरणाचे अंतिम प्रमाणपत्र आणि ओळखपत्राद्वारे ओळखपत्र देण्यात येणार आहे. या ओळखपत्र धारकांना लोकलमध्ये प्रवासासाठी मासिक, त्रैमासिक पास देण्याबाबत विशेष नियमावली तयार करण्यात आली आहे. परंतु, राज्य सरकारकडून रेल्वे विभागाला सूचना मिळाली नसल्याने, लोकलमध्ये सर्वसामान्य नागरिकांना प्रवेश देण्याबाबत संभ्रमच आहे.
पुणे-लोणावळा, पुणे-दौंड मार्गावरील रेल्वे सेवेला परवानगी मिळाली नाही. राज्य शासनाने केवळ मुंबईकरांची व्यवस्था केली. मुंबईकर तुपाशी आणि अन्य नागरिक उपाशी अशी स्थिती आहे, असे मत रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा यांनी सांगितले.