सक्रिय रुग्ण दुप्पट होण्यास तब्बल 40 दिवस
– सुनील राऊत
पुणे – शहरात करोनावर मात करणाऱ्या बाधितांची संख्या 63 टक्के आहे. त्याचवेळी शहरातील बाधित दुप्पट होण्याचा कालावधी आता 40 दिवसांवर गेला आहे. त्यामुळे पालिकेस दिलासा मिळाला.
आता केंद्रीय पथकाच्या सूचनेनुसार, शहरातील अत्यवस्थ रुग्णसंख्या कमी करणे आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सक्रिय रुग्णांच्या उपचारांवर पालिकेकडून लक्ष केंद्रित केले जात आहे.
शहरात पहिला करोनाबाधित 9 मार्च रोजी आढळला. सध्या शहरातील एकूण बाधितांची संख्या 8 हजारवर गेली तरी त्यातील 63 टक्के लोक ठणठणीत बरे होऊन गेले आहेत. मात्र, त्याच वेळी शहराच्या आरोग्य यंत्रणेसाठी आणखी एक दिलासादायक बाबही समोर आली आहे. शहरात करोनाचे बाधित रूग्ण सापडल्यानंतर त्यांना वैद्यकीय देखरेखीखाली 14 दिवस ठेवण्यात येत असे. त्यानंतर या रुग्णांना घरी सोडण्यात येत असे. मात्र केंद्र सरकारने या कालावधीत बदल करून बाधित रुग्णांना तसेच करोना संशयित रुग्णांसाठी दहा दिवसांचा विलगीकरण कालावधी निश्चित केला. त्यामुळे उपचार घेऊन ठणठणीत बरे होण्याचे प्रमाण वाढले. त्यामुळे, एकूण रूग्णांची संख्या वाढली असली तरी सक्रिय रुग्ण संख्या 34 टक्के आहे.
शहरात 22 एप्रिल रोजी 605 सक्रिय रुग्ण होते, तर हे रुग्ण पुढील आठ दिवसात म्हणजे 1 मे रोजी म्हणजे अवघ्या 8 दिवसांत सक्रिय रुग्णांचा सुमारे 1195 वर गेला. त्यानंतर मात्र, शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या थेट 9 जून रोजी 2486 झाली आहे. त्यामुळे तब्बल 40 दिवसानंतर शहरातील सक्रिय रुग्णांचा आकडा दुप्पट झाला आहे.
शहरात सध्याच्या सक्रिय बाधितांपैकी सुमारे 80 टक्के जणांना कोणतीही लक्षणे नाहीत. मात्र, नियमानुसार त्यांना दहा दिवस विलगीकरणात ठेवले जाते. उर्वरित 20 टक्क्यांमध्ये सुमारे 200 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मात्र, सक्रिय रुग्णांची संख्या तुलनेने कमी असल्याने प्रशासनाने आता आपला मोर्चा मृत्यूदर कमी करण्यासाठी या अत्यवस्थ रुग्णांकडे वळविला आहे.
– रूबल अग्रवाल, महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त