तिरुअनंतपुरम – केरळमध्ये आणखी एका हत्तीचा संदिग्ध मृत्यू झाला आहे. शरीरावर जबर मार लागल्याने हत्तीचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. या जखमी हत्तीला केरळच्या उत्तर निलांबूर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्रात उपचारासाठी ठेवण्यात आले होते.
पशुवैद्यकीय टीम हत्तीला वाचविण्याचा प्रयत्न करीत होती. मात्र, हत्तीने प्राण त्याग केला. एका वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले की, पाच दिवसांपासून या हत्तीवर उपचार सुरू होते.
काही लोकांनी या जखमी हत्तीला पाहिल्यानंतर वनविभागाला कळविले. वनअधिकाऱ्यांनी निरीक्षण केले असता हत्तीला जबर मारहाण झाल्यामुळे तो जखमी झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले. इतर हत्तींसोबत झालेल्या लढाईत हा हत्ती जखमी झाला असावा, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर लोकांकडून हत्तीला मारहाण झाल्याचीही शक्यता नाकारता येत नाही. केरळमध्ये पंधरा दिवसांत दोन हत्तींचा संदिग्ध मृत्यू झाला आहे.