पुणे -महाशिवरात्री निमित्ताने शनिवार पेठेतील पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिर, जंगली महाराज रस्त्यावरील पाताळेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शहरातील शिवमंदिरात शनिवारी सकाळपासून अभिषेक, पूजा असे विविध कार्यक्रम सुरू होते. दरम्यान मंदिर परिसरात पहाटेपासूनच भाविकांचा उत्साह पाहावयास मिळाला.
यावेळी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ओंकारेश्वर मंदिर प्रशासनाच्या वतीने भाविकांसाठी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती. महाशिवरात्री असल्याने पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांची रांग लागली होती. ओंकारेश्वर मंदिरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दर्शनासाठी येणार असल्याने पोलिसांचा मोठा बंदोबस्त होता. परंतु मंदिरात दर्शनासाठी भाविकांचा उत्साह कायम होता. महाशिवरात्री निमित्त संपूर्ण मंदिराला विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली होती.
शनिवार पेठेतील भरत मित्र मंडळाने शंकराच्या मूर्तीची मिरवणूक काढली होती. यावेळी शिवभक्तांची मोठी गर्दी पहायला मिळाली. या ठिकाणी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. त्यामुळे मंदिर परिसर चैतन्यमय झाल्याचे पाहावयास मिळाले. या निमित्ताने सामाजिक संघटनेच्या वतीने फळ आणि दूधा वाटप केले. महाशिवरात्री निमित्त शहरात उत्साह पहायला मिळाला.
चक्क्यातून साकारला शंकराचा मुखवटा
बुधवार पेठेतील श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे महाशिवरात्रीनिमित्त दत्तमंदिरात 101 किलो चक्क्याची शंकराची पिंड, मुखवटा आणि फळा-फुलांची आरास करण्यात आली. शिल्पकार सचिन जोशी यांनी साकारलेला शंकराचा मुखवटा विशेष आकर्षण ठरला. तसेच सुकामेवा, फळे आणि विविध प्रकारच्या फुलांचा वापर करुन साकारण्यात आलेली ही चक्केश्वराची पूजाही साकारण्यात आली.