पुणे – स्पोर्टसफिल्ड मॅनेजमेंट आयोजित पहिल्या पुनित बालन करंडक अजिंक्यपद 14 वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पेस ऍथलेटीक क्रिकेट अकादमी आणि ब्रिलीयंन्ट् स्पोर्टस अकादमी संघांमध्ये विजेतेपदसाठी लढत होणार आहे.
या स्पर्धेत सार्थक ढमढेरे याच्या नाबाद 81 धावांच्या खेळीमुळे पेस ऍथलेटीक क्रिकेट अकादमी संघाने हेरंब क्रिकेट अकादमीचा 8 गडी राखून सहज पराभव करत अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना हेरंब क्रिकेट अकादमीने 25 षटकामध्ये 8 गडी गमावून 157 धावांचे आव्हान उभे केले. हे आव्हान पेस ऍथलेटीक क्रिकेट अकादमीने 24 षटकात पूर्ण केले. सार्थक ढमढेरे याने 75 चेंडूत 10 चौकार आणि 2 षटकारांसह नाबाद 81 धावांची खेळी केली. सार्थक याने शौर्य पारेख (नाबाद 21 धावा) याला साथीला घेत तिसऱ्या गड्यासाठी 71 चेंडूत 83 धावांची अभेद्य भागिदारी करून संघाला विजय मिळवून दिला.
क्षितीय चव्हाण याने झळकावलेल्या 107 धावांच्या जोरावर ब्रिलीयंन्ट् स्पोर्टस अकादमी संघाने गॅरी कर्स्टन क्रिकेट क्लबचा 118 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्यांदा फलंदाजी करताना ब्रिलीयंन्ट् स्पोर्टस अकादमीने 29 षटकामध्ये 4 गडी गमावून 204 धावांचे आव्हान उभे केले. यामध्ये क्षितीज चव्हाण याने 107 धावांची तर, वेदांत देवहाडे याने 51 धावांची खेळी करून संघाला 204 धावांचे आव्हान उभे करून दिले. या आव्हानाला उत्तर देताना गॅरी कर्स्टन क्रिकेट क्लबचा डाव 20.1 षटकात 86 धावांवर मर्यादित राहीला.
संक्षिप्त धावफलक –
उपांत्य फेरी : हेरंब क्रिकेट अकादमी : 25 षटकात 8 बाद 157 धावा. (सुमित साळुंके 48, पार्थ संतोष 34, सार्थक बिराजदार 24, अर्जुन सोनार 3-34, आदित्य हराळे 2-25) पराभूत वि. पेस ऍथलेटीक क्रिकेट अकादमी ः 24 षटकात 2 बाद 158 धावा (सार्थक ढमढेरे नाबाद 81, शौर्य पारेख नाबाद 21, अनुज चौधरी 1-28). सामनावीर ः सार्थक ढमढेरे.
ब्रिलीयंन्ट् स्पोर्टस अकादमी : 29 षटकात 4 बाद 204 धावा. (क्षितीज चव्हाण 107, वेदांत देवहाडे 51) वि. वि. गॅरी कर्स्टन क्रिकेट क्लब ः 20.1 षटकात 9 बाद 86 धावा. (अरहुम पर्लेशा 40, आर्या कुमावत 4-36, साईराज शेलार 3-16). सामनावीर ः क्षितीज चव्हाण.