मुंबई – मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि आक्रमक फलंदाज वीरेंद्र सेहवागही पुर्वाश्रमीची भारतीय संघाच्या सलामीवीरांची जोडी पुन्हा एकदा मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाली आहे. वल्ड रोड सेफ्टी स्पर्धेत भारताचा सामना परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार असून याच सामन्यात सचिन आणि सेहवाग पुन्हा एकदा भारताच्या डावाची सुरुवात करणार आहेत.
रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीजचा दुसरा मोसम लवकरच सुरू होत असल्याने पुन्हा एकदा जागतिक स्तरावर गाजलेल्या माजी खेळाडूंना खेळताना पाहण्याची संधी चाहत्यांना मिळणार आहे. ही स्पर्धा भारत आणि अमिरातीत खेळवली जाणार आहे.
या लीगचे भारतातील सामने 5 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून 1 मार्चपासून पुढील सामने अमिरातीत खेळवले जाणार आहेत. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 मार्च रोजी होणार आहे.
या स्पर्धेत पहिल्या मोसमात भारतीय संघाने विजेतेपद मिळवले होते. भारत आणि पाकिस्तान ही लढत 12 मार्चला होणार असून स्पर्धेत एकूण 38 सामने खेळवले जाणार आहेत.